गारीवडेत दिवसाढवळ्या गव्यांच्या कळपामुळे भीती; जनजीवन धोक्यात

गगनबावडा (विलास पाटील ) : गगनबावडा तालुक्यातील गारीवडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचा वावर वाढला असून, जंगलातील वैरण आणि पाण्याच्या कमतरतेमुळे वन्यजीव थेट गावात प्रवेश करत आहेत. काल, रविवारी सकाळी ८:३० वाजता सुमारे वीस गव्यांचा कळप गारीवडे गावात दिवसाढवळ्या दिसल्याने नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गव्यांच्या वाढत्या संख्येमुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच, भुईवडे, अगदूर, खोतवाडी, सांगशी यांसारख्या इतर ठिकाणीही वन्यजीवांचे दर्शन होत असल्याने परिसरातील जनजीवन धोक्यात आले आहे. संबंधित विभाग यावर ठोस उपाययोजना करत नसल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.वन विभागाने तातडीने हस्तक्षेप करून गव्यांच्या संख्येंवर नियंत्रण आणावे आणि वन्यजीव संरक्षण तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.




