वाढदिवसाचा अनोखा आणि सामाजिक वारसा! अभिषेक मोरे यांच्याकडून स्मशानभूमीसाठी १००० शेणी दान

गोकुळ शिरगाव: सध्याच्या काळात वाढदिवस म्हणजे जंगी पार्ट्या, केक आणि डीजेचा मोठा आवाज असे समीकरण बनले आहे. मात्र, समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवत अभिषेक मोरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक अत्यंत कौतुकास्पद आणि भावूक उपक्रम राबवला आहे. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्थानिक स्मशानभूमीसाठी १००० (एक हजार) शेणी दान केल्या आहेत.
मृत्यूनंतरच्या विधींसाठी आणि अंत्यसंस्कारासाठी ग्रामीण भागात शेणींची मोठी गरज भासते. अनेकदा पावसाळ्यात किंवा ऐनवेळी या गोष्टींची कमतरता जाणवते. हीच गरज ओळखून, वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत अभिषेक मोरे यांनी हा मदतीचा हात पुढे केला आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या उपक्रमांतर्गत गोळा केलेल्या १००० शेणी अधिकृतपणे स्थानिक ग्रामसेवक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. या शेणींचा वापर स्मशानभूमीतील अंत्यसंस्काराच्या कामासाठी केला जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा साठा जतन करून गरजूंच्या वेळी वापरण्यात येईल.
यावेळी अभिषेकी मोरे यांच्यासोबत त्यांच्या मित्रपरिवाराने आणि गावातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यामध्ये किरण शिरगावकर, गौरव वाघमारे, अभिषेक कुरणे, साताप्पा कांबळे, सतीश एरंडोल, राम कांबळे, गणेश कांबळे, अक्षय कांबळे, अर्जुन आणि इतर मित्रपरिवार. प्रामुख्याने उपस्थित होत्या. अभिषेक मोरे यांच्या या निर्णयामुळे गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. “वाढदिवस हा केवळ आनंदाचा क्षण नसून तो समाजाचे ऋण फेडण्याची संधी आहे,” हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
“अभिषेक मोरे यांचा हा उपक्रम आजच्या तरुण पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. अनावश्यक खर्च टाळून समाजाच्या उपयोगी पडतील अशा गोष्टी केल्या पाहिजेत.” — ग्रामस्थ
आजच्या दिखाऊपणाच्या जगात अभिषेक मोरे यांनी राबवलेला हा ‘शेणी दान’ उपक्रम खऱ्या अर्थाने माणुसकी आणि सामाजिक भान जपणारा ठरला आहे.




