कागल बसस्थानक तात्पुरते बंद; प्रवाशांसाठी पर्यायी वाहतूक!

कागल (सलीम शेख ) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ , कोल्हापूर विभागाने कागल येथील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. कागल बसस्थानकाच्या आवारात कॉंक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आल्यामुळे, बसस्थानक तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन, महामंडळाने उपलब्ध केलेल्या पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कागल बसस्थानक कॉंक्रिटीकरणाच्या कामामुळे, दिनांक ०६/१२/२०२५ पासून काम पूर्ण होईपर्यंत बसस्थानकातून होणारी वाहतूक थांबवण्यात येईल. कागल बसस्थानकातून होणारी प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामंडळाने खालील तीन ठिकाणी पर्यायी थांब्यांची सोय केली आहे.
कोल्हापूर, पुणे, रंकाळा याकडे जाणाऱ्या बसेससाठी हायवे पलीकडे स्टार चिकन दुकानासमोर थांबा करण्यात आला आहे.
निपाणी, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, सावंतवाडी, बुरगुड, शेंडूर, बाचणी याकडे जाणाऱ्या
जुना बसस्थानकाबाहेर थांबा करण्यात आला आहे.
हुपरी, इचलकरंजी, जयसिंगडी याकडे जाणाऱ्या बसेससाठी
भुयेकर पेट्रोलपंपासमोर थांबा करण्यात आला आहे.
प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, कोल्हापूर विभागाने दिलगिरी व्यक्त केली आहे. महामंडळाने प्रवाशांना कामामध्ये सहकार्य करावे आणि आपल्या नियोजित प्रवासासाठी केवळ याच पर्यायी थांब्यांवरून बस पकडावी, असे आवाहन केले आहे.




