कागल श्री शाहू उद्यान निपाणी वेस येथे मधमाशांचा हल्ला; तिघेजण जखमी, एकाची प्रकृती गंभीर

कागल (सलीम शेख ) : कागल येथील श्री शाहू उद्यान निपाणी वेस परिसरात आज अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यात एक महिला, एक वृद्ध आणि एक युवक अशा तिघांना गंभीर दुखापत झाली. जखमींना तातडीने कागल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निपाणी वेस परिसरात मधमाशांचे थवे अचानक सक्रिय झाले आणि त्यांनी परिसरातील नागरिकांना लक्ष्य केले. या हल्ल्यात मनाली सौरभ पाटील, बाबुराव मारुती आवळे आणि अमोल कृष्णात कांबळे हे तिघे जखमी झाले.
तर काही जखमींना कागल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर किरकोळ दुखापत असल्याने सोडून देण्यात आले.
परंतु, अमोल कृष्णात कांबळे यांच्यावर कागल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय, मनाली सौरभ पाटील आणि बाबुराव मारुती आवळे यांना अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांपैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.




