राजारामपुरी येथे मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोघांना अटक; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त!

राजारामपुरी (सलीम शेख ) : राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या मोबाईल चोरी प्रकरणाचा अखेर यशस्वीरित्या उलगडा करण्यात आला आहे. राजारामपुरी पोलिसांनी जलदगतीने तपास करत याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेला मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राजारामपुरी परिसरातील शेंडा पार्क ते आर.के.नगर रोडवर फिर्यादी व्यक्ती मोबाईलवर बोलत पायी जात असताना, मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला होता. या घटनेनंतर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पोलिसांनी अलताफ आयुब किल्लेदार आणि पृथ्वीराज रवी बाबरे या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत आरोपींनी मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. जप्त केलेला मुद्देमाल: पथकाने चोरी गेलेला १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे.
हस्तगत केलेल्या वस्तूंची एकूण किंमत ६५ हजार रुपये आहे. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप पाटील हे पुढील तपास करत आहेत. राजारामपुरी पोलिसांनी केलेल्या या जलद कारवाईमुळे नागरिक आणि विशेषतः पादचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.




