दत्त जयंती महाप्रसादातून तब्बल 250 हून अधिक नागरिकांना विषबाधा; आरोग्य यंत्रणेवर ताण, जमिनीवर उपचार करण्याची वेळ!

गडहिंग्लज: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातून एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. तालुक्यातील सांबरे गावात दत्त जयंतीनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमातील महाप्रसाद खाल्ल्यानंतर तब्बल 250 हून अधिक नागरिकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी दुपारनंतर ही गंभीर लक्षणे दिसू लागल्याने केवळ सांबरे गावच नव्हे, तर संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सांबरे गावात शुक्रवारी सकाळी दत्त जयंतीनिमित्त एका भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला परिसरातील जवळपास दोन हजारहून अधिक भाविक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर या सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हा महाप्रसाद खाल्ल्यानंतर दुपारनंतर अचानक अनेक भाविकांची तब्येत बिघडण्यास सुरुवात झाली. महाप्रसाद खाल्लेल्या लोकांना उलटी, जुलाब, पोटदुखी व मळमळ यांसारखी लक्षणे दिसू लागली. या बाधितांमध्ये लहान मुले, महिला, पुरुष आणि वृद्धांसह सुमारे 10 ते 15 आजूबाजूच्या गावांतील भक्तांचा समावेश आहे. सध्या बाधितांची संख्या 250 हून अधिक असल्याची माहिती असून, ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणेची मोठी तारांबळ उडाली. सुरुवातीला 100 ते 125 रुग्णांवर नेसरी ग्रामीण रुग्णालय आणि गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू करण्यात आले. रुग्णांची संख्या प्रचंड असल्याने उर्वरित बाधितांना कानडेवाडी, माणगाव, कोवाड येथील आरोग्य केंद्रे तसेच खासगी दवाखान्यांमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयांमध्ये बेड अपुरे पडल्यामुळे काही रुग्णांवर अक्षरशः जमिनीवरच उपचार करण्याची वेळ आरोग्य कर्मचाऱ्यांवर आली. औषधे आणि इतर सुविधांचीही कमतरता भासत असल्याची माहिती समोर येत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बेळगावातील केएलई वैद्यकीय संघाची टीम तातडीने सांबरे गावात दाखल झाली असून, ते तपासणी करत आहेत.
सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, परिसरात अद्यापही भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे: “ज्या लोकांना त्रास जाणवत असेल, त्यांनी घाबरून न जाता तातडीने नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा आणि योग्य उपचार घ्यावेत,” असे आवाहन प्रशासनाने केले आहे. महाप्रसाद कोणत्या कारणामुळे दूषित झाला, याबाबतचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोग्य विभाग या घटनेची सखोल तपासणी करत आहे.




