महाराष्ट्र ग्रामीण

डॉ. आंबेडकरांच्या नावाला विरोध! कोल्हापूरच्या वाघापूरमधून नागपूर हिवाळी अधिवेशनाकडे बौद्ध समाजाचा ‘लाँग मार्च’

कोल्हापूर / भुदरगड: कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मौजे वाघापूर येथील ग्रामसभेत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला आक्षेप घेत विरोध करण्यात आल्यामुळे समाजात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या जातीयवादी भूमिकेमुळे संतप्त झालेल्या बौद्ध समाजाने ९ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या नागपूरच्या दिशेने पायी ‘लाँग मार्च’ काढण्याचा निर्धार केला आहे. बौद्ध समाजाच्या म्हणण्यानुसार, ग्रामसभेत संविधानाचा अवमान करत केवळ जातीयवादी प्रवृत्तीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या उल्लेखाला विरोध करण्यात आला आहे, ज्यामुळे जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. मौजे वाघापूर येथील बौद्ध समाजाच्या मालकी हक्कातील गट नंबर २ मध्ये एकूण ०.३९.०० गुंठे क्षेत्र आहे. यातील ०.०३ गुंठे स्मशानभूमी आणि ०.०६ गुंठे प्रचलित महार तळे अशी एकूण ०.०९ गुंठे जागा जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशानुसार ‘महार समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी’ म्हणून मंजूर झाली आहे (फेरफार डायरी नंबर १२५२ नुसार ७/१२ पत्रके नमूद आहेत).या जागेत महार समाजाच्या लोकांचे दफन होत होते आणि तळ्याच्या पाण्यावर पिके अवलंबून होती.

तळ्याचे सपाटीकरण: गावातील ग्रामपंचायतीने बौद्ध समाजाची दिशाभूल करून, तळे स्वच्छ करण्याच्या नावाखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय महार तळे, स्मशानभूमी आणि पडीक जमीन सपाटीकरण केली, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्रवेशद्वाराचा ठराव: या सपाटीकरणानंतर बौद्ध समाजाने विरोध दर्शवल्यानंतर गावात तेढ निर्माण होऊ नये म्हणून प्रतिष्ठित व्यक्ती, सरपंच, सदस्य आणि बौद्ध समाज यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत, या जागेस प्रवेशद्वार बांधून त्याला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचे सर्वानुमते ठरले होते. या जागेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी २६ जानेवारी २००४, २६ जानेवारी २०१३, २६ जानेवारी २०१५ आणि २६ जानेवारी २०२५ अशा वेगवेगळ्या ग्रामसभांमध्ये ठराव झालेले असतानाही, त्यांच्या नावाला जाणीवपूर्वक विरोध केला जात आहे २६ फेब्रुवारी २०२५ च्या मासिक सभेमध्येही या नावाला तीव्र विरोध करण्यात आला. बौद्ध समाजाने म्हटले आहे की, स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होऊन ‘अमृतमहोत्सव’ साजरा होत असतानाही, जातीयवादी प्रवृत्तीने संविधानाने दिलेली स्वातंत्र्य, समता, न्याय या मूल्यांचा बहिष्कार करून संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली आणि अवमान केला आहे.

शासन निर्णय क्र. ५ मे २००४ च्या परिपत्रकानुसार कोणत्याही महापुरुषांचे नाव देता येत नाही, असा उल्लेख असतानाही, २६ जानेवारी २००४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर कमान उभी करण्याचा ठराव सर्वानुमते पास झालेला आहे. संविधानाचा सन्मान करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान तात्काळ उभी करण्याची अंमलबजावणी करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली.  परंतु, कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही किंवा न्याय मिळाला नाही, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या न्यायप्रक्रियेतील विलंबामुळे हताश झालेल्या बौद्ध समाजाने ९ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्राचे राज्य सरकार, कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचवण्यासाठी कोल्हापूर येथून नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या दिशेने पायी लाँग मार्च काढण्याचा निर्धार केला आहे. या गंभीर घटनेमुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button