महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ व्हावा – हिंदु जनजागृती समितीचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन!

कोल्हापूर (सलीम शेख ) : राज्यात ‘लव्ह जिहाद’ची वाढती प्रकरणे आणि महिलांवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात तात्काळ ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ लागू करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने ११ डिसेंबर २०२५ रोजी केली. समितीने मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले हे निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्याकडे सादर केले.
यावेळी समितीने स्पष्ट केले की, नगर येथील सामूहिक अत्याचार, इचलकरंजी येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार यांच्यासारख्या घटना ही केवळ वैयक्तिक गुन्हेगारी नसून तो संघटित कट आहे. त्यामुळे महिलांना सुरक्षितता देण्यासाठी, उत्तर प्रदेश आणि राजस्थान राज्यांच्या धर्तीवर कठोर कायदा तात्काळ करणे आवश्यक आहे. निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये या कायद्यात आजन्म कारावासाची तरतूद असावी, गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र घोषित करावेत, तसेच तक्रार करण्याचा अधिकार पीडितेसोबत कोणत्याही नागरिकाला असावा याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, विशेष पोलीस शाखा आणि ‘रणरागिणी’ पथकाची स्थापना करणे आणि विदेशातून येणारा निधी, तस्करी व जिहादी नेटवर्कचा सखोल तपास करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीने राज्यभरातील २२ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी निवेदने दिली. कोल्हापुरात निवेदन देताना अशोक गुरव, किशोर घाटगे, संभाजीराव भोकरे, गजानन तोडकर, प्रशांत पाटील, विक्रम जरग यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




