महाराष्ट्र ग्रामीण

कोल्हापूरच्या ‘कन्यां’ची कमाल! फुटबॉलसाठी राज्यस्तरीय निवड; मुंबईत मेस्सी-मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव!

मुंबई: महाराष्ट्रातील फुटबॉलला नवी दिशा देण्यासाठी महत्त्वाकांक्षी ‘प्रोजेक्ट महादेवा’ अंतर्गत कोल्हापूरच्या तीन गुणवान युवा महिला फुटबॉलपटूंनी राज्यस्तरीय संघात स्थान मिळवले आहे. रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर अर्जेंटिनाचा विश्वविजेता कर्णधार आणि फुटबॉलचा देव मानल्या जाणाऱ्या लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या खेळाडूंना शिष्यवृत्ती आणि मार्गदर्शन देऊन गौरविण्यात आले.

‘प्रोजेक्ट महादेवा’ या राज्य सरकारच्या १३ वर्षांखालील (U-13) मुलामुलींसाठी असलेल्या शिष्यवृत्ती प्रकल्पासाठी राज्यभरातून निवडलेल्या ६० खेळाडूंच्या अंतिम यादीत कोल्हापूरच्या दोन मुलींनी यश मिळवले आहे. दिव्या सतीश गायकवाड (श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल, कणेरी) साक्षी संदीप नावळे (श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल, कणेरी या दोघींसह अन्य एका खेळाडूची राज्यस्तरीय संघात निवड झाली आहे. कोल्हापूरच्या या तीन युवा खेळाडूंनी कठोर परिश्रम आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर हे स्थान मिळवले आहे.

राज्यात फुटबॉलचा विकास आणि प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र शासन, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) आणि इतर संस्थांच्या सहकार्याने ‘प्रोजेक्ट महादेवा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाचा उद्देश २०३४ पर्यंत भारताला फुटबॉल विश्वचषकात पात्र बनवणे आणि ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवणे हा आहे. मुंबईतील या दिमाखदार सोहळ्यात लिओनेल मेस्सी यांनी या निवड झालेल्या ६० युवा खेळाडूंना जवळपास ४५ मिनिटे विशेष मार्गदर्शन आणि फुटबॉलचे धडे दिले. कोल्हापूरच्या या खेळाडूंसाठी मेस्सीकडून प्रशिक्षण मिळणे हा त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेस्सीचे स्वागत करताना, “मेस्सी, तुम्ही आमच्या खेळाडूंना प्रेरणा दिली आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो की, या खेळाडूंपैकी एकतरी खेळाडू फिफा विश्वचषकात खेळताना तुम्हाला नक्कीच दिसेल,” असा विश्वास व्यक्त केला. या सोहळ्याला क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, फुटबॉलपटू सुनील छेत्री आणि बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनीही हजेरी लावली होती. निवड झालेल्या या युवा फुटबॉलपटूंचे पुढील पाच वर्षांसाठी संपूर्णपणे पालकत्व राज्य सरकार घेणार आहे. यामध्ये त्यांचे शिक्षण, उच्च दर्जाचे फुटबॉल प्रशिक्षण आणि निवासाची उत्तम व्यवस्था यांचा समावेश आहे. या माध्यमातून उत्कृष्ट खेळाडू तयार करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्वल करण्याचे ध्येय आहे. कोल्हापूरच्या या युवा ‘कन्यां’च्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, या निवडीमुळे कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राची मान उंचावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button