मुरगूड येथे ‘गारगोटी खजिना लुट’च्या शहिदांना रोषणाईने विनम्र अभिवादन!

मुरगूड (बाळासो कांबळे): भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक ज्वलंत अध्याय असलेल्या गारगोटी खजिना लुट (१३ डिसेंबर १९४२) घटनेतील सात शहीद क्रांतीवीरांना मुरगूड येथील हुतात्मा तुकाराम भारमल चौक येथे नुकतेच दीप प्रज्वलित करून आणि रोषणाईने विनम्र आदरांजली वाहण्यात आली. सुज्ञ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शूर हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण केले.
१३ डिसेंबर १९४२ रोजी मध्यरात्री घडलेली गारगोटी खजिना लुटीची घटना ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ग्रामीण आणि रांगड्या शेतकरी कुटुंबातील सात देशभक्तांच्या असामान्य शौर्याची गाथा आहे. ब्रिटीश शासनाची आर्थिक रसद तोडणे आणि लुटीतील पैसा क्रांतीसाठी वापरणे. तुरुंगवासात असणाऱ्या गांधीवादी नेत्यांना सोडवणे. कोल्हापूरहून येणाऱ्या लष्कर व पोलिसांना गारगोटीपर्यंत पोहचण्यापासून रोखण्यासाठी कूर (ता. भुदरगड) येथील वेदगंगा पूल उडवण्याची योजना आखण्यात आली होती. क्रांतीवीरांनी मुरगूड, कापशी, चिखली सिमाभागातील संघटना मजबूत करून ही योजना आखली होती. मात्र, गुप्तहेरांमुळे ही माहिती ब्रिटीश शासनापर्यंत पोहोचली.
वेळेत स्फोट न झाल्यामुळे कूर येथील पूल उडवण्याचा प्रयत्न फसला. क्रांतीवीरांचे दुसरे पथक पाल घाटातील गुहेतून गारगोटी पोलीस कचेरीवर हल्ला करण्यासाठी सज्ज झाले. रात्रीच्या अंधारात जोरदार गोळीबार झाला आणि मोठी चकमक झाली. याच ऐतिहासिक क्रांतिकारी घटनेत इंग्रजांच्या गोळ्या झेलून सात देशप्रेमी वीरांनी मराठमोळ्या देशप्रेमासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या या सात मराठी वीरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हुतात्मा तुकाराम भारमल चौक येथे दीप प्रज्वलन करण्यात आले आणि नागरिकांतून मनोगत व्यक्त करण्यात आली.
गारगोटी खजिना लुटीत शहीद झालेले सात वीर:
| क्र. | हुतात्मा वीरांचे नाव | गाव आणि तालुका |
| १ | करवीर सिध्दया स्वामी | कापशी, ता. कागल |
| २ | शंकर कृष्णाजी इंगळे | कापशी, ता. कागल |
| ३ | तुकाराम रामजी भारमल | मुरगूड, ता. कागल |
| ४ | नारायण दाजी वारके | कलनाकवाडी, ता. भुदरगड |
| ५ | मल्लाप्पा बाजीराव चौगले | चिखली, ता. कागल |
| ६ | बळवंत लक्ष्मण जबडे | जत्राट |
| ७ | परशराम कृष्णाजी साळोखे | खडकलाट, ता. चिकोडी |
या सात क्रांतीकारी देशभक्तांसह हरिबा कृष्णा बेनाडे (चिखली, ता. कागल) यांनाही वीरमरण आले. या सर्व शूर वीरांना उपस्थितांनी कोटी कोटी प्रणाम करत, त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेण्याचा संकल्प केला.




