जितेंद्रसिंग कंपनीचा निष्काळजीपणा; निपाणी-फोंडा राज्यमार्गावर राधानगरी PWD विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष!!

मुरगूड (शिकंदर जमादार): निपाणी-फोंडा या अत्यंत महत्त्वाच्या राज्यमार्गाची दुरवस्था आणि संबंधित कंत्राटदार कंपनीच्या कामातील हलगर्जीपणामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. जितेंद्रसिंग कंपनीने अवघ्या दोन वर्षांपूर्वी तयार केलेला हा रस्ता पूर्णपणे उखडला असून, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. रस्त्याच्या या निकृष्ट कामाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि जागृत मालक फाउंडेशन यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाने खडबडून जागे होत घाईघाईने पॅचवर्कचे काम हाती घेतले. मात्र, हे पॅचवर्क नागरिकांसाठी नवीन डोकेदुखी ठरत आहे. ज्या ठिकाणी खड्डे भरले आहेत, तिथे रस्ता इतका उंच-सखल झाला आहे की वाहनधारकांना ते ‘स्पीड ब्रेकर’ असल्याचा भास होतो. विशेषतः दुचाकी वाहने या पॅचवर्कवरून जाताना मोठ्या प्रमाणात ‘जंप’ घेत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. “जनतेच्या जिवाचे काहीही झाले तरी चालेल, फक्त काम पूर्ण झाल्याचे दाखवायचे,” अशीच वृत्ती कंत्राटदाराची दिसत असल्याचा आरोप होत आहे.
मुरगूड शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावरच १० बाय २० फुटांचे सिमेंट काँक्रीटचे पॅचवर्क करण्यात आले. हे काम करताना उरलेला टाकाऊ (वेस्टेज) माल रस्त्याच्या दोन्ही बाजूला तसाच टाकून देण्यात आला आहे. हे काम पूर्ण होऊन आता दोन ते तीन महिने उलटले आहेत, तरीही हा राडारोडा तेथून हलवण्यात आलेला नाही. यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा येत असून, रात्रीच्या वेळी वाहनधारकांना या ढिगाऱ्यांचा अंदाज न आल्याने भीषण अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. राधानगरी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. “सार्वजनिक बांधकाम विभाग हा वेस्टेज ढिग कधी उचलणार? प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल वाहनधारकांनी विचारला आहे.
संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी, तसेच प्रवेशद्वारासमोरील राडारोडा आणि रस्त्यावरील ‘स्पीड ब्रेकर’ सदृश पॅचवर्क तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि जागृत मालक फाउंडेशन यांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास जनतेचा अंत न पाहता तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. जितेंद्रसिंग कंपनीच्या कामावर प्रश्नचिन्ह, सपाटीकरण नसल्याने दुचाकींचे अपघात वाढले., राधानगरी PWD विभागाकडून तक्रारींकडे कानाडोळा. दोषी कंत्राटदारावर कारवाई करून रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी.




