मुरगूडमध्ये युवकांनी स्वच्छता मोहिमेतून वाहिली राष्ट्रसंत गाडगेबाबांना आदरांजली; दोन ट्रॉली कचरा काढला बाहेर!

मुरगूड | प्रतिनिधी: (बाळासो कांबळे) : अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला स्वच्छतेचा मंत्र देणाऱ्या राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी मुरगूडमध्ये अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. केवळ हार-तुरे न अर्पण करता, शहरातील युवकांनी विविध सार्वजनिक ठिकाणी श्रमदान करून आणि परिसर चकाचक करून बाबांना खऱ्या अर्थाने विनम्र अभिवादन केले. सकाळी कडाक्याची थंडी असतानाही, समाजाप्रती असलेल्या कर्तव्याच्या भावनेतून मुरगूडमधील युवक सकाळी ६ वाजताच एकत्र जमले. सकाळी ६ ते ९ या वेळेत तब्बल तीन तास ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये शहरातील खालील प्रमुख ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली: दत्त मंदिर परिसर, वेदगंगा नदी घाट, स्थानिक स्मशानभूमी परिसर, गाव तलाव आणि ऑक्सीजन पार्क
या मोहिमेचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे गाव तलावाची स्वच्छता. तलावाच्या परिसरात आणि पाण्याकाठी मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. युवकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत तलावातील आणि परिसरातील कचरा गोळा केला. यावेळी तब्बल दोन ट्रॉली कचरा बाहेर काढण्यात आला आणि त्याची प्रशासकीय नियमांनुसार योग्य विल्हेवाट लावण्यात आली. यामुळे ऑक्सीजन पार्क आणि तलाव परिसर पूर्णपणे स्वच्छ आणि सुंदर झाला आहे. या स्तुत्य उपक्रमात शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट यांच्यासह ओंकार पोतदार, तानाजी भराडे, अमोल मेटकर, नामदेव भराडे, बाळासो भराडे, शिवाजी चौगले, आनंदा रामाने, संकेत शहा, प्रफुल कांबळे, प्रकाश परिषवाड, अमर सुतार, आनंदा मोरे, भैरू बेलेकर, जगदीश गुरव, रघुनाथ बोडके, धनंजय सूर्यवंशी आणि विनायक मेटकर या युवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी आणि मॉर्निंग वॉकला येणाऱ्या रहिवाशांनी या युवकांचे काम पाहून त्यांचे भरभरून कौतुक केले. “गाडगेबाबांचे विचार केवळ भाषणात न ठेवता ते कृतीत आणण्याचे काम या युवकांनी केले आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.




