रस्ते की ‘स्मशानवाटे’चा प्रवास? निढोरी-आदमापूर मार्गावर १३ जणांचा बळी; प्रशासकीय दिरंगाईचा पंचनामा!

मुरगूड : प्रतिनिधी (बाळासो कांबळे) निढोरी ते आदमापूर या मार्गावरील रस्ते विकास कामाचा विलंब आता प्रवाशांच्या जीवावर बेतू लागला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (राधानगरी) आणि जितेंद्रसिंग कंपनीने दिलेली २५ ऑक्टोबरची डेडलाईन उलटून दोन महिने झाले, तरीही कामाचा पत्ता नाही. या नियोजनशून्य कारभारामुळे आतापर्यंत १३ जणांना आपला जीव गमवावा लागला असून, शेकडो लोक जखमी झाले आहेत. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, या मार्गावरील अपघातांची दाहकता भीषण आहे. ग्रामीण रुग्णालय मुरगूड आणि मुरगूड पोलीस ठाणे यांच्याकडील आकडेवारी प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड करते:
-
अपघाती मृत्यू: पोलीस रेकॉर्डनुसार आतापर्यंत १३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
-
गंभीर जखमी: ५०% पेक्षा जास्त मार लागलेले आणि ‘फ्रॅक्चर’ झालेले ७६ रुग्ण नोंदवले गेले आहेत.
-
पोलीस दप्तरी नोंद: एकूण २६ मोठे अपघात नोंदवले असून, जखमींची संख्या २५ आहे.
-
किरकोळ जखमी: २०२२ ते २०२५ या काळात तब्बल १४४ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. (टीप: प्रत्यक्षात ही संख्या यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असण्याची शक्यता आहे.)
जितेंद्रसिंग कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) राधानगरी यांनी लेखी किंवा तोंडी स्वरूपात २५ ऑक्टोबरपर्यंत रस्ते, संरक्षण कठडे आणि गटारांची कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. आजही आदमापूर ओढ्याजवळ आणि वेदगंगा पुलाजवळ उघडी गटारे मृत्यूला निमंत्रण देत आहेत. रस्ता उंच केला पण त्याला बाजूने Guard Rails (संरक्षण कठडे) लावले नाहीत. परिणामी, वाहन थोडे जरी अनियंत्रित झाले तरी ते थेट खोल ओढ्यात किंवा गटारात कोसळत आहे. रात्रीच्या वेळी तर हा मार्ग म्हणजे एक प्रकारचे ‘डेथ ट्रॅप’ बनला आहे. खड्डे भरताना ते रस्त्याच्या पातळीत न भरता उंचवटे करून भरल्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात वाढले आहेत. १३ मृत्यू आणि शेकडो लोक जखमी होऊनही कंपनीचे मॅनेजर वर्गीस आणि संबंधित अधिकारी ढिम्म हलत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. “अजून किती बळी घेतल्यावर तुमची कामे पूर्ण होणार?” असा आर्त सवाल मृतांच्या नातेवाईकांकडून आणि ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
या भीषण परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि जागृत मालक फाउंडेशन यांनी कंबर कसली आहे. जर तातडीने गटारे बंद करून संरक्षक कठडे बसवले नाहीत, तर प्रशासनाला रस्त्यावर उतरून जाब विचारला जाईल आणि होणाऱ्या कोणत्याही परिणामाची जबाबदारी PWD व कंत्राटदार कंपनीवर असेल, असा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे १३ निष्पाप जीवांचा बळी गेला आहे, याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का? हाच आता खरा प्रश्न आहे.




