महाराष्ट्र ग्रामीण

‘कुंभमेळे व्हावेत, पण झाडं तुटता कामा नये’ – अभिनेते सयाजी शिंदे यांचा रोखठोक इशारा!

नाशिक: आगामी २०२७ सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक येथील तपोवन परिसरात साधूग्राम उभारण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रस्तावित वृक्षतोडीवरून अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘कुंभमेळे, जत्रा, सण नक्की साजरे व्हावेत, पण हे करताना एकही झाड तुटू नये’, असा स्पष्ट आणि रोखठोक मुद्दा त्यांनी मांडला आहे. नाशिकमधील तपोवन येथील वृक्षतोडीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सयाजी शिंदे यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शासनाच्या धोरणांवर आणि वृक्षतोडीच्या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त केला.

“कुंभमेळे व्हावेत, न व्हावेत हा माझा प्रश्न नाही, ते व्हावेत. जत्रा व्हाव्यात, कुंभमेळे व्हावेत, सण साजरे करावेत, पण हे करताना कुठेही झाडं तुटली नाहीत हाच माझा मुद्दा आहे,” असे शिंदे म्हणाले. त्यांनी झाडांचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, “झाडं ही आमची आई-बाप आहेत. आमच्या आई-बापांवर कोणी हल्ला करत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही.” “एक झाड तोडून त्या बदल्यात दहा नवीन झाडे लावू, ही कल्पनाच अतिशय चुकीची आणि हास्यास्पद आहे. ही मोठी, जुनी झाडे जास्त ऑक्सिजन देतात आणि कार्बन शोषून घेतात. नवीन झाडांची तुलना त्यांच्याशी होऊ शकत नाही,” असा सवाल त्यांनी केला. त्यांनी थेट प्रश्न विचारला, “झाडं तोडणं हे साधू-संतांना तरी पटेल का? ऋषी-मुनी झाडाखालीच तपश्चर्या करत होते. मग साधूंच्या निवासासाठी झाडं तोडणे योग्य आहे का?”

नाशिकमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरात ११५० एकर जागेवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी १८०० हून अधिक झाडांची कत्तल केली जाणार असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिक करत आहेत. याच वृक्षतोडीविरोधात सध्या नाशिकमध्ये तीव्र आंदोलन उभे राहिले आहे. सयाजी शिंदे यांनी नाशिककरांच्या या लढ्याला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला असून, कोणत्याही परिस्थितीत तपोवनातील एकही झाड तुटू देणार नाही, असा गर्भित इशारा त्यांनी शासनाला दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button