गोकुळ शिरगाव येथे महिला सन्मान परिषदेच्या पाठपुराव्याला यश; प्रभाग १ मधील अद्ययावत धोबी घाटाचे लोकार्पण!

गोकुळ शिरगाव (प्रतिनिधी): येथील प्रभाग क्रमांक १ मधील महिलांची अनेक वर्षांची पाण्याची आणि कपडे धुण्याची गैरसोय आता दूर झाली आहे. महिला सन्मान परिषदेने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे येथील विहिरीवर सुरक्षिततेसाठी जाळी बसवून, कपडे धुण्यासाठी अद्ययावत धोबी घाटाचे काम पूर्ण झाले असून, याचे भव्य उद्घाटन रविवारी, ५ जानेवारी रोजी उत्साहात पार पडले. प्रभाग क्रमांक १ मधील विहिरीवर सुरक्षिततेचा अभाव होता, तसेच महिलांना कपडे धुण्यासाठी योग्य जागा उपलब्ध नव्हती. ही समस्या ओळखून महिला सन्मान परिषदेच्या वतीने वेळोवेळी प्रशासनाला निवेदने देण्यात आली होती. परिषदेच्या पदाधिकारी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करत होत्या. अखेर डिसेंबर महिन्यात या धोबी घाटाचे काम पूर्ण झाले. विहिरीवर संरक्षक जाळी बसवण्यात आली असून, विहिरीबाहेर महिलांसाठी कपडे धुण्याची स्वतंत्र व सोयीस्कर व्यवस्था करण्यात आली आहे.
या नूतन धोबी घाटाचे उद्घाटन गावाचे सरपंच चंद्रकांत डावरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला सन्मान परिषदेच्या कार्याचे कौतुक करताना सरपंच म्हणाले की, “गावातील महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी परिषदेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अशा विकासकामांना नेहमीच प्राधान्य दिले जाईल.” या प्रसंगी महिला सन्मान परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई शिरगावकर यांनी आपल्या मनोगतातून हा लढा महिलांच्या सुविधेसाठी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला सीमा कांबळे, प्राजक्ता कांबळे, मनीषा कुरणे, दीपाली कांबळे यांच्यासह रघुनाथ कांबळे, अश्विनी कांबळे, हर्षवर्धन कांबळे, विवेक पाटील, संगीत पाटील, दादासो कांबळे, अभिषेक मोरे, रणजित पाटील, साताप्पा कांबळे, शामराव पाटील, रंगराव कांबळे आणि गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. विहिरीवर लोखंडी जाळी बसवल्यामुळे दुर्घटनेचा धोका टळला. विहिरीच्या बाहेरच पाणी काढून कपडे धुण्याची व्यवस्था केल्याने महिलांची ओढाताण थांबली. ग्रामपंचायत प्रशासन आणि महिला संघटना यांच्या समन्वयाचे उत्तम उदाहरण.
या कामामुळे परिसरातील महिलांनी समाधान व्यक्त केले असून, महिला सन्मान परिषदेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.




