महाराष्ट्र ग्रामीण

चिखली-कौलगे परिसरात मगरीच्या वावराने घबराट; वन विभागाच्या ‘त्या’ उत्तरामुळे नागरिकांमध्ये संताप!

कागल (प्रतिनिधी – बाळासो कांबळे): कागल तालुक्यातील चिखली, कौलगे आणि नदीकाठच्या परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून मगरीचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अनेक ग्रामस्थांनी मगरीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र, इतकी गंभीर परिस्थिती असतानाही स्थानिक प्रशासन आणि वन विभाग सुस्त असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. चिखली आणि कौलगे या गावांच्या हद्दीत नदीकाठी मगरीने ठाण मांडले आहे. अनेक शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी प्रत्यक्ष मगरीला पाहिले असून, त्यामुळे नदीकाठी जाणे आता धोक्याचे बनले आहे. असे असतानाही स्थानिक ग्रामपंचायत, सरपंच किंवा ग्रामसेवक यांनी अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. “प्रशासन एखाद्या व्यक्तीचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.

दिनांक १९/०१/२०२६ रोजी चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप कांबळे यांनी या संदर्भात वन विभागाशी संपर्क साधला. त्यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेले उत्तर ऐकून नागरिक अवाक झाले आहेत. “नदी हे मगरीचे घर आहे, तिला तिथून हलवून कुठे सोडणार?” असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. या उत्तरामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. जर नदी मगरीचे घर आहे, तर तिथे वावरणाऱ्या मानवाच्या जीवाची काहीच किंमत नाही का? प्राण्यांपेक्षा माणसाचे मरण स्वस्त झाले आहे का? असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत. १९ तारखेला वन विभागाच्या पथकाने परिसरात येऊन पाहणी केली आहे. मात्र, केवळ पाहणी करून न थांबता मगरीला तातडीने जेरबंद करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

दोन महिन्यांपासून दहशत: मगरीच्या वावरामुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. सोशल मीडियावरील पुरावे: अनेक तरुणांनी मगरीचे फोटो व्हायरल करून धोक्याची सूचना दिली आहे. प्रशासनाचा निष्काळजीपणा: स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून खबरदारीच्या कोणत्याही सूचना किंवा उपाययोजना नाहीत. इशारा: जर मगरीने एखाद्या व्यक्तीवर हल्ला केला किंवा कोणाचा बळी गेला, तर त्याला पूर्णपणे स्थानिक प्रशासन आणि वन विभाग जबाबदार असेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. लवकरात लवकर मगरीला रेस्क्यू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा पवित्रा चिखली-कौलगे परिसरातील नागरिकांनी घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button