महाराष्ट्र ग्रामीण

कोल्हापुरात राज्य उत्पादन शुल्कचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त!

कोल्हापूर: आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात अवैध दारू तस्करीविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. याच मोहिमेअंतर्गत कागल तालुक्यातील बसवडे फाटा येथे एका ट्रकवर छापा टाकून सुमारे ६२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ४० लाख रुपयांची गोवा बनावटीची देशी दारू जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कागल पथकाला देवगड-निपाणी राज्य महामार्गावरून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने बसवडे फाटा येथे सापळा रचून एका टाटा मोटर्स कंपनीच्या ट्रकची (MH-40-CM-2535) तपासणी केली.

तस्करांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ट्रकमध्ये पाठीमागच्या बाजूला पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स ठेवले होते. मात्र, अधिकाऱ्यांनी ट्रकची सखोल झडती घेतली असता, समोरच्या बाजूला ‘रॉकेट देशी दारू’ ब्रँडचे तब्बल १,००० बॉक्स आढळून आले. यात ९० मिलीच्या सुमारे ९ लाख बाटल्या होत्या.

४० लाखांची दारू, २० लाखांचा ट्रक, मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण ६२.५० लाखांचा माल. या दारूवर अहमदनगरमधील ‘प्रवरा डिस्टिलरी’चे लेबल लावून ती महाराष्ट्रात विकण्याचा प्रयत्न होता, मात्र प्राथमिक तपासात ही दारू गोव्यात तयार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा साठा कोल्हापूरमार्गे नागपूरला नेला जात होता.

या प्रकरणी ट्रक चालक सलीम खयूम शेख (रा. तेलंगणा, सध्या यवतमाळ) आणि क्लीनर सूरज तेजराव सावंत (रा. यवतमाळ) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम, भारतीय न्याय संहिता आणि ट्रेडमार्क ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button