महाराष्ट्र ग्रामीण

कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा दणका; १ कोटी ३० लाखांची अवैध दारू जप्त!

कोल्हापूर | विशेष प्रतिनिधी: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू तस्करांविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा घाटात बुधवारी पहाटे करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल १ कोटी ३० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बुधवारी (२१ जानेवारी) पहाटे ५:३० च्या सुमारास अणुस्कुरा फाटा (राजापूर-मलकापूर रोड) येथे सापळा रचला होता. यावेळी संशयास्पदरीत्या येणाऱ्या एका अशोक लेलँड ६ चाकी ट्रकला (क्र. MH-20-EG-1310) थांबवून तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूचा साठा आढळून आला. गोवा बनावटीची ‘रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की’ – १६०० बॉक्स (७६,८०० बाटल्या). जप्त केलेल्या दारूची किंमत सुमारे १ कोटी १५ लाख २० हजार रुपये आहे. दारूची वाहतूक करणारा ट्रक आणि मोबाईल असा एकूण १ कोटी ३० लाख ५० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चालक रामजीवन विरधाराम बिश्नोई (वय २६, रा. बाडमेर, राजस्थान) याला अटक करण्यात आली असून ही दारू गोव्यावरून गुजरातच्या दिशेने नेली जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

कागलमध्येही ६२ लाखांची कारवाई

केवळ अणुस्कुराच नव्हे, तर कागल विभागानेही बसवडे फाटा येथे मोठी कारवाई केली. यामध्ये तस्करांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ट्रकच्या मागील भागात पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे ५०० बॉक्स रचले होते. मात्र, त्याच्या आड लपवलेले ‘रॉडकेट देशी दारू’चे १००० बॉक्स (किंमत ६२.५ लाख) उत्पादन शुल्क विभागाने शोधून काढले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख आणि कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्हा हा गोवा आणि कर्नाटक सीमेवर असल्याने येथून होणारी तस्करी रोखण्यासाठी सीमा तपासणी नाक्यांवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

“अवैध दारू वाहतूक आणि विक्रीविरुद्ध आमचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारची माहिती असल्यास १८०० २३३ ३३३३ या टोल फ्री क्रमांकावर कळवावे.” — स्नेहलता नरवणे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button