‘मुंबईत फक्त जय महाराष्ट्रच चालणार!’; संजय राऊतांचा भाजपवर घणाघाती प्रहार

मुंबई: “मुंबईचा महापौर हा मराठीच होणार! ‘जय श्रीराम’ आमच्या हृदयात आहेच, पण मुंबईच्या मातीत ‘जय मराठी’, ‘जय महाराष्ट्र’, ‘जय भवानी’ आणि ‘जय शिवाजी’ हाच नारा चालणार,” अशा शब्दांत शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी भाजपच्या ‘हिंदू महापौर’ कार्डला ‘मराठी अस्मिते’ने उत्तर दिले.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने ‘मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच होईल’ अशी भूमिका मांडली आहे. यावर भाष्य करताना संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, “आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, ते आमच्या रक्तात आहे. अयोध्येत जेव्हा आम्ही लढत होतो, तेव्हा आज हिंदुत्वाच्या गप्पा मारणारे अनेकजण कुठे होते?”
नारा फक्त मराठीच: मुंबईत राजकारण करायचे असेल, तर ‘जय महाराष्ट्र’ म्हणावाच लागेल. इतर कोणत्याही घोषणांपेक्षा इथे मराठी अस्मितेचा जयघोषच श्रेष्ठ राहील. महापौर कुणाचा?: मुंबईचा महापौर हा अस्सल मराठी आणि ‘ठाकरे’ ब्रँडचाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी शिवसेना-मनसे युतीचा (ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याचा) उल्लेख करत ही युती ‘दिल आणि दिमाग’ने झाल्याचे म्हटले. भाजपवर निशाणा: मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप करत, त्यांनी भाजप नेते के. अन्नामलाई यांच्या “मुंबई शहर महाराष्ट्राचे नाही” या कथित विधानाचा तीव्र निषेध केला.
मुंबई मनपा निवडणुकीत यंदा ‘मराठी विरुद्ध अमराठी’ आणि ‘अस्सल हिंदुत्व विरुद्ध बेगडी हिंदुत्व’ असा संघर्ष पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘मराठी-हिंदू’ महापौराचा पुनरुच्चार केला असतानाच, राऊत यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा देऊन आक्रमक पवित्रा घेतला आहे.




