कुरणी बंधाऱ्याला मोठी गळती; पाटबंधारे विभागाच्या ‘अक्षम्य’ दुर्लक्षामुळे शेतीसह वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर!

मुरगूड : प्रतिनिधी (बाळासो कांबळे) मुरगूड शहराला उत्तर भागातील गावांशी जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या कुरणी बंधाऱ्याची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून, वाढत्या जड वाहतुकीमुळे त्याचे स्ट्रक्चर खिळखीळे झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही पाटबंधारे विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुरगूड शहराच्या दळणवळणासाठी कुरणी, भडगाव, मळगे बुद्रुक, सावर्डे, चौडाळ, पिंपळगाव यांसारख्या अनेक गावांची वाहतूक याच बंधाऱ्यावरून चालते. गेल्या काही वर्षांत या मार्गावरील रहदारीत प्रचंड वाढ झाली आहे. हा बंधारा मुळातच जुना झाला असून, अवजड वाहनांचा भार पेलण्याची त्याची क्षमता संपत आली आहे. पुलाला ठिकठिकाणी तडे गेले असून गळतीमुळे पाया कमकुवत होत आहे.
विशेष म्हणजे, २०२३ मध्ये ग्रामस्थांनी या बंधाऱ्याच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी पाटबंधारे विभागाने देखरेख करून तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात कोणतीही हालचाल झाली नाही. प्रशासकीय उदासीनता पाहून मयूर आंगज यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून स्वखर्चाने या बंधाऱ्यावरील खड्डे भरले होते. एका सामाजिक कार्यकर्त्याने दाखवलेली ही तत्परता पाटबंधारे विभागाला का दाखवता आली नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. बंधाऱ्याला लागलेल्या मोठ्या गळतीमुळे पाणी साठवण क्षमतेवर परिणाम होत आहे. याचा थेट फटका परिसरातील शेती सिंचनाला बसत आहे. जर ही गळती वेळीच थांबवली नाही, तर उन्हाळ्यात या भागातील पिके करपण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच, भविष्यात बंधारा पूर्णपणे निकामी झाल्यास अनेक गावांचा मुरगूडशी असलेला संपर्क कायमचा तुटू शकतो.
“प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थ विचारत आहेत. पाटबंधारे विभागाने तातडीने या बंधाऱ्याची पाहणी करून गळती थांबवावी आणि पुलाचे मजबुतीकरण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.
“या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे. जर वेळेत लक्ष दिले नाही, तर हा बंधारा कधीही कोसळू शकतो. प्रशासनाने तातडीने हालचाल करावी.” — स्थानिक ग्रामस्थ




