Uncategorizedमहाराष्ट्र ग्रामीण

मुरगूड नगरपरिषदेचा नगर अभियंता ४० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत; हुपरीतील कामासाठी मागितली होती १.३० लाखांची लाच

मुरगूड (प्रतिनिधी – बाळासो कांबळे):): मुरगूड नगरपरिषदेचे नगर अभियंता (स्थापत्य, वर्ग-२) प्रदीप पांडुरंग देसाई (वय ३२, रा. मिणचे खुर्द, ता. भुदरगड) यांना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सोमवारी, १९ जानेवारी २०२६ रोजी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. हुपरी नगरपरिषदेतील कामाचे ‘एमबी रजिस्टर’ पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात त्यांनी ही लाच मागितली होती. या कारवाईमुळे नगरपरिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

प्रदीप देसाई हे सध्या मुरगूड नगरपरिषदेत कार्यरत असले तरी, यापूर्वी ते हुपरी नगरपरिषदेत सेवेत होते. हुपरी नगरपरिषदेच्या अंतर्गत एका कंत्राटदाराने केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी आवश्यक असलेले एमबी रजिस्टर (Measurement Book) पूर्ण करून देण्यासाठी देसाई यांनी १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम १ लाख ३० हजार रुपये ठरली. यातील ५० हजार रुपये त्यांनी यापूर्वीच स्वीकारले होते. उर्वरित रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून ४० हजार रुपये सोमवारी स्वीकारताना त्यांना एसीबीच्या पथकाने मुरगूड येथील बस स्थानक परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने देसाई यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या कार्यालयाची, वाहनाची आणि अंगझडती घेतली. यावेळी त्यांचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. तसेच, त्यांच्या मूळ गावी मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथील घराची झडती घेण्याची प्रक्रिया देखील राबवण्यात आली. याप्रकरणी मुरगूड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरगूडमध्ये बदली होऊन आल्यानंतरही देसाई यांच्याबद्दल अनेक तक्रारी होत्या. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील खराब झालेल्या रस्त्यांच्या कामांबाबत तक्रारी करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. “स्वतःची तिजोरी भरण्यासाठी निकृष्ट दर्जाची कामे करून घेणाऱ्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला जेलची हवा खावीच लागेल,” अशा तीव्र भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सुधीर पाटील, संदीप काशीद, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील आणि चालक प्रशांत दावणे यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button