दबंगगिरीचा कळस! चिखलीत गरिबाचे शौचालय जेसीबीने पाडले; ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मानवता पायदळी

चिखली (प्रतिनिधी, बाळासो कांबळे): एकीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वत्र विकासाच्या गप्पा मारल्या जात आहेत, तर दुसरीकडे कागल तालुक्यातील चिखली (दसरा चौक) येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या १५ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या अमोल बाळासो लोहार या गरीब कुटुंबाचे हक्काचे शौचालय शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अमोल लोहार हे अत्यंत गरीब असून मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घरात वयोवृद्ध आई, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक रहिवासी दादू हरी बेनाडे याने कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा कोणताही कायदेशीर आधार नसताना हुकूमशाही पद्धतीने जेसीबी आणला. चालक तकदीर इस्माईल किल्लेदार याच्या मदतीने क्षणात हे शौचालय पाडून टाकले. ऐन थंडीच्या दिवसात आणि निवडणुकीच्या काळात हे कृत्य केल्याने लोहार कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. “आता माझ्या वृद्ध आईने आणि घरातील महिलांनी उघड्यावर शौचास जायचे का?” असा उद्विग्न सवाल अमोल लोहार यांनी उपस्थित केला आहे.
सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून उमेदवार घरोघरी जाऊन आश्वासनांची खैरात करत आहेत. मात्र, दसरा चौकातील या पीडित कुटुंबाच्या अश्रूंकडे कोणाचे लक्ष जाणार? असा प्रश्न ग्रामस्थांमधून विचारला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकार ‘हागणदारी मुक्त’ गावासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, अशा प्रकारे सुरू असलेल्या दबंगगिरीमुळे ‘स्वच्छ भारत’ अभियानाची चिखलीत थट्टा होताना दिसत आहे.
“आम्ही गरिबांनी जगायचे कसे? आमचे कोणाशीही भांडण नव्हते, तरीही आमचे शौचालय पाडले गेले. आता माझ्या लहान मुलांनी आणि आईने कुठे जायचे? आम्हाला फक्त न्याय हवा आहे.” — पीडित अमोल बाळासो लोहार, चिखली.
दोषी दादू बेनाडे आणि जेसीबी चालक तकदीर किल्लेदार यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल व्हावा. २. नुकसान भरपाई: पीडित लोहार कुटुंबाला प्रशासनाने तातडीने नवीन शौचालय बांधून द्यावे किंवा योग्य नुकसान भरपाई द्यावी. ३. कडक कारवाई: निवडणूक आचारसंहितेच्या काळात सामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या अशा प्रवृत्तींवर प्रशासनाने वचक निर्माण करावा.
आता या प्रकरणाकडे स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कशा प्रकारे पाहणार? अमोल लोहार यांच्या गरीब कुटुंबाला न्याय मिळणार का? याकडे संपूर्ण कागल तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.




