तामगावात कुस्तीच्या आखाड्यातील लाल मातीवरून थरार; तलवारीने हल्ला करत तिघांना केले जखमी!

गोकुळ शिरगाव (इरफान मुल्ला): कुस्तीच्या आखाड्यासाठी आणलेली लाल माती चोरून नेण्यास हटकल्याच्या कारणावरून करवीर तालुक्यातील तामगाव येथे तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेत तिघे जण गंभीर जखमी झाले असून, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास तामगाव येथील हनुमान नगरमधील कुस्तीच्या आखाड्यात ही घटना घडली. फिर्यादी कृष्णात शिवाजी जोंधळेकर (वय ४२) यांनी आखाड्यासाठी लाल माती आणून ठेवली होती. यावेळी दोन अल्पवयीन मुले रिक्षातून ही माती भरून घेऊन जात होती. कृष्णत यांनी त्यांना ही माती कुस्तीच्या मैदानासाठी आहे, ती नेऊ नका असे सांगून हटकले यावरून चिडलेल्या मुलांनी त्यांचे वडील आणि मुख्य आरोपी नानकसिंग राजुसिंग शिख (वय ३६) याला घटनास्थळी बोलावून घेतले. कृष्णात यांनी नानकसिंगलाही माती नेण्यापासून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या नानकसिंगने ‘माझ्या मुलांना माती नेण्यापासून कोण थांबवतो ते बघतोच’ असे म्हणत गाडीतील तलवार आणि कोयता काढून फिर्यादीवर हल्ला केला. बचावासाठी धावलेल्यांवरही वार हल्ल्यादरम्यान कृष्णात यांना वाचवण्यासाठी आलेले विजय नाना जोंधळेकर यांच्या डोक्यावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी हात आडवे धरले असता त्यांच्या हाताच्या तळव्यावर गंभीर जखम झाली.
तसेच मदतीला धावलेले सुनील बाळू गंगाधर आणि किरण हराळे यांच्यावरही कोयत्याने हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आले. गावात दहशत पसरवण्याचा प्रयत्न हल्ला केल्यानंतर आरोपी नानकसिंग शिख याने हातातील शस्त्रे हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली आणि फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे तामगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास जीपीएसआय शेख करत आहेत.




