असिफखान पठाण यांची सलग सहाव्यांदा महाराष्ट्र राज्य हॉकी संघात निवड!

पन्हाळा (प्रतिनिधी : बाळासो कांबळे): केंद्र शासनाच्या विद्यमाने दि.१७ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दिल्ली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा स्पर्धा (हॉकी) २०२५-२६’ साठी कोल्हापूरचे सुपुत्र आणि राष्ट्रीय हॉकी खेळाडू श्री. असिफखान पठाण यांची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. विशेष म्हणजे, ही त्यांची सलग सहाव्यांदा झालेली निवड असून क्रीडा क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे.
मुंबई येथील प्रसिद्ध महेंद्र स्टेडियमवर दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या निवड चाचणीतून पठाण यांनी आपले स्थान निश्चित केले. श्री. पठाण हे सध्या पन्हाळा येथील भूमि अभिलेख कार्यालयात शिरस्तेदार म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते कास्ट्राईब भूमी अभिलेख संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणूनही सामाजिक व प्रशासकीय जबाबदारी पार पाडत आहेत.
यापूर्वी त्यांनी रायपूर (छत्तीसगड), भोपाळ (मध्य प्रदेश) कुरुक्षेत्र (हरियाणा), भुवनेश्वर (ओरिसा), काकीनाडा (आंध्र प्रदेश), या ठिकाणी महाराष्ट्र संघांचे यशस्वी प्रतिनिधित्व केले आहे. सदर निवडीसाठी त्यांना भूमि अभिलेख पुणे विभागाचे उपसंचालक मा. विष्णू शिंदे, कोल्हापूरचे जिल्हा अधीक्षक मा. श्री. शिवाजी भोसले तसेच पन्हाळा उपअधीक्षक मा. मनोज महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
प्रशासकीय कामाचा गाडा सांभाळत असतानाच खेळाप्रती असलेली त्यांची जिद्द तरुण कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, दिल्लीतील आगामी स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.



