मुरगूड नाका बनला ‘मौत का कुवा’; उघड्या गटारामुळे अपघाताला निमंत्रण!

मुरगूड : प्रतिनिधी (बाळासो कांबळे) येथील मुरगूड नाका नंबर १ च्या कमानी शेजारीच असलेल्या मुख्य प्रवेशद्वारावर गटारीचे झाकण गायब झाल्याने या परिसराला ‘अपघाताचा सापळा’ असे स्वरूप आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ही जीवघेणी अवस्था कायम असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग (राधानगरी) याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त प्रवाशांनी या उघड्या गटाराला ‘मौत का कुवा’ असे नाव दिले आहे. मुरगूड नाका हा परिसरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. दिवसा कसाबसा बचाव होत असला तरी, रात्रीच्या वेळी उघड्या गटाराचा अंदाज येत नाही. यामुळे अनेक दुचाकीस्वार आणि पादचारी यामध्ये कोसळून गंभीर जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे एखाद्याचा बळी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिकांचा संताप; बळी गेल्यानंतर जाग येणार का?
जितेंद्रसिंग कंपनीने केलेल्या कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत आता नागरिकांमधून उघडपणे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गटारातून पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. समस्या समोर येऊन सहा महिने उलटले, तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर साधे झाकण बसवण्याचे सौजन्य दाखवलेले नाही.
“एखादा मोठा अपघात होऊन कोणाचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? सहा महिने झाले आम्ही तक्रार करत आहोत, पण अधिकारी ढिम्म आहेत. तात्काळ दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.” — स्थानिक रहिवासी व प्रवासी
मुरगूड शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ही दुरावस्था असल्याने शहराच्या प्रतिमेलाही तडा जात आहे. आता तरी राधानगरी सार्वजनिक बांधकाम विभाग या ‘मौत का कुवा’ पासून नागरिकांची सुटका करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




