महाराष्ट्र ग्रामीण

मुरगूड ग्रामीण रुग्णालयाचा कारभार रामभरोसे; डॉक्टरांच्या निवासस्थानाचे रूपांतर ‘कबाडखान्यात’!

​दहा-पंधरा वर्षांपासून इमारत धूळ खात; जनतेचा पैसा मातीमोल, प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष

मुरगूड (​प्रतिनिधी : बाळासो कांबळे): मुरगूड शहरासह परिसरातील २० ते २५ गावांसाठी आरोग्याचे मुख्य केंद्र असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज असल्याचे दावे करणाऱ्या प्रशासनाचा खरा चेहरा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापाशीच उघडा पडला आहे. निवासी डॉक्टरांसाठी बांधण्यात आलेली हक्काची इमारत गेल्या १० ते १५ वर्षांपासून वापराविना पडून असून, तिचे रूपांतर आता चक्क ‘कबाडखान्यात’ झाले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या मुख्य गेटला लागूनच निवासी डॉक्टरांसाठी ही टोलेजंग इमारत उभारण्यात आली आहे. लाखो रुपये खर्चून बांधलेली ही वास्तू आज अखेर धूळ खात पडली असून, तिथे राहण्यास कोणीही फिरकत नाही. विशेष म्हणजे, या इमारतीचे प्रवेशद्वारही मोडकळीस आले असून, सुरक्षेचा कोणताही पत्ता नाही. प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे जनतेचा कष्टाचा पैसा अक्षरशः मातीत मिसळताना दिसत आहे. ​एकीकडे ‘स्वच्छ भारत’ अभियानाच्या गप्पा मारल्या जात असताना, या इमारतीच्या परिसरात भयानक अस्वच्छता पसरली आहे. इमारतीचा वापर निवासी कारणाऐवजी टाकाऊ सामानासाठी (कबाडखाना) केला जात आहे. इतकेच नव्हे तर, गेट उघडे असल्याने आणि देखरेख नसल्याने काही लोक या इमारतीचा वापर लघुशंकेसाठी करत आहेत. रुग्णालयासारख्या पवित्र आणि संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारचे अश्लाघ्य प्रकार घडणे ही मुरगूडकरांसाठी खेदाची बाब ठरत आहे. ​रुग्णालयाची मुख्य इमारत प्रशस्त असली तरी, तिच्या आजूबाजूला आणि पाठीमागील बाजूस मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली आहेत. यामुळे रुग्णालयात येणारे रुग्ण आणि कर्मचारी यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात आणि रात्रीच्या वेळी सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढण्याची भीती व्यक्त होत असूनही प्रशासन सुस्त का? असा सवाल नागरिक विचारत आहेत. “जर डॉक्टरांना राहण्यासाठी इमारत बांधली आहे, तर ते तिथे का राहत नाहीत? कित्येक कर्मचारी येऊन-जाऊन ड्युटी करतात, पण या हक्काच्या वास्तूची काळजी का घेतली जात नाही? प्रशासनाला जाग कधी येणार?” मुरगूड ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य डाॅक्टर रविंद्र कांबळे यांनी पुर्णपणे डोळेझाक पद्धतीने दुर्लक्ष केले आहे . या इमारती ला कोणी वाली नाही का हाच प्रश्न जनतेला पडलाय .येथील प्रशासनाला जाग येणार का ? ही इमारत मोकळा श्वास घेणार का ? ग्रामीण रुग्णालय प्रशासन विभागाला सुबुद्धी यावी हीच अपेक्षा .

​या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन, त्या इमारतीची दुरुस्ती करून ती वापरायोग्य करावी आणि परिसरातील झाडेझुडपे काढून स्वच्छता करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button