स्वच्छतेच्या वसातून संत गाडगेबाबांना अभिवादन; मुरगूडच्या तरुणांकडून सरपिराजीराव तलाव परिसराचा कायापालट!
परिसरातील जलस्रोत टिकवण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे.- सहभागी कार्यकर्ते

मुरगूड (प्रतिनिधी : बाळासो कांबळे): ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’चा मंत्र देत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून, मुरगूड (ता. कागल) येथील शिवभक्त व सामाजिक कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक सरपिराजीराव तलाव परिसरात महास्वच्छता मोहीम राबवली. केवळ हार-तुरे न अर्पण करता प्रत्यक्ष ‘श्रमदान’ करून या तरुणांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. तीन तासांचे अविरत श्रमदान: आज सकाळी ६ ते ९ या वेळेत ही मोहीम राबवण्यात आली. सकाळी कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता तरुणांनी हातात झाडू आणि टोपली घेऊन तलाव परिसर चकाचक केला. गेल्या अनेक दिवसांपासून साठलेला कचरा या मोहिमेमुळे पूर्णपणे नष्ट करण्यात आला.
या मोहिमेदरम्यान धक्कादायक वास्तवही समोर आले. निसर्गरम्य तलाव परिसरात पर्यटकांनी टाकलेला कचरा मोठ्या प्रमाणावर आढळला. यामध्ये: एक ट्रॉलीभर सुका व ओला कचरा, मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पत्रावळ्या आणि द्रोण, ५०० हून अधिक दारूच्या रिकाम्या बाटल्या. हे सर्व साहित्य गोळा करून परिसराचे विद्रुपीकरण थांबवण्यात आले. यातून पर्यावरणाचे रक्षण करण्यासोबतच सामाजिक शिस्तीचा संदेशही देण्यात आला.
मुरगूडमधील हे तरुण केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता, गेली तीन वर्षे सातत्याने अशी कामे करत आहेत. शिवजयंती असो वा महापुरुषांची पुण्यतिथी, हे कार्यकर्ते मंदिर, ओढे, नाले आणि तलावांच्या स्वच्छतेचा ध्यास घेऊन एकत्र येतात. ”गाडगेबाबांनी आयुष्यभर हातात खराटा घेऊन समाज स्वच्छ केला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. या मोहिमेत सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, तानाजी भराडे, आनंदा रामाने, पप्पू कांबळे, नामदेवराव भराडे, जगदीश गुरव, अक्षय पोतदार, अमोल मेटकर, आनंद बैलकर, बाजीराव मांगोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवभक्त आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण मुरगूड शहरातून आणि परिसरातून कौतुक होत आहे.




