मुरगूड नगरपरिषदेला फक्त ‘टॅक्स’ दिसतो, ‘कचरा’ नाही! ‘आम्हाला माहीत नाही’ म्हणत प्रशासनाचा डोळेझाकपणा; नागरिक आजारपणाच्या खाईत!

मुरगूड (प्रतिनिधी : बाळासो कांबळे): स्वच्छतेच्या नावाखाली करदात्या नागरिकांच्या खिशातून ‘टॅक्स’ वसूल करणाऱ्या मुरगूड नगरपरिषदेचा संतापजनक आणि ‘घाणेरडा’ कारभार उघड झाला आहे. सूर्यवंशी/मांगोरे कॉलनीच्या पाठीमागील जनावरांच्या अड्ड्यात नगरपरिषदेने चक्क २० ते २५ ट्रॉली कचरा टाकून या परिसराला डंपिंग ग्राऊंडचे स्वरूप दिले आहे. याबाबत जाब विचारणाऱ्या नागरिकांना “आम्हाला काहीच माहीत नाही” असे उडवाउडवीचे उत्तर देऊन प्रशासनाने आपल्या मुजोरीचे दर्शन घडवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून नगरपरिषदेचे ट्रॅक्टर उघडपणे या निवासी वसाहतीच्या मागे कचरा टाकत आहेत. प्रशासनानेच नियम धाब्यावर बसवल्याचे पाहून आता खाजगी नागरिक आणि बांधकाम व्यावसायिकही मागे राहिलेले नाहीत. नवीन घरे बांधणारे नागरिक आपल्या घराचा ‘वेस्टेज’ (राडारोडा) आणि टाकाऊ माल याच जनावरांच्या अड्ड्यात आणून टाकत आहेत. आतापर्यंत १५ ते २० ट्रॉली खाजगी राडारोडा येथे जमा झाला असून, यामुळे हा परिसर पूर्णपणे बकाल झाला आहे. केवळ कचराच नाही, तर या जनावरांच्या अड्ड्यात आता अनधिकृतपणे लमानी झोपड्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कचरा, राडारोडा आणि वाढती अतिक्रमणे या तिन्ही गोष्टींकडे नगरपरिषदेच्या स्वच्छता आणि अतिक्रमण विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाच्या या ‘आशीर्वादामुळे’ कॉलनीतील नागरिकांना जगणे असह्य झाले आहे.
या गंभीर विषयावर रहिवाशांनी अनेकदा तोंडी तक्रारी केल्या, मात्र प्रशासनाला त्याचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे. ओला-सुका कचरा कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, डेंग्यू आणि मलेरियासारख्या जीवघेण्या आजारांनी डोके वर काढले आहे. “आम्ही टॅक्स भरतो तो काय नगरपालिकेचा कचरा आणि रोगराई सहन करण्यासाठी?” असा संतप्त सवाल येथील रहिवासी विचारत आहेत.
(१) प्रशासनाचा खोटारडेपणा: पालिकेचे ट्रॅक्टर स्वतः कचरा टाकतात आणि अधिकारी “माहित नाही” म्हणत नागरिकांची दिशाभूल करत आहेत. (२) नियमबाह्य कृत्य: निवासी क्षेत्रात आणि जनावरांच्या अड्ड्यात कचरा टाकणे हा कायद्याने गुन्हा असूनही नगरपरिषदच हा गुन्हा करत आहे. (३) अतिक्रमणाकडे दुर्लक्ष: वाढत्या झोपड्यांमुळे या परिसरातील सुरक्षितता आणि स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
”मुरगूड नगरपरिषदेने स्वतः २०-२५ ट्रॉली कचरा टाकला आहे आणि वरून खोटे बोलत आहेत. स्वच्छता विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. जर तातडीने हा कचरा हटवला नाही आणि अतिक्रमणे रोखली नाहीत, तर आम्हाला संविधानाच्या मार्गाने यात उतरावे लागेल.” — शिकंदर जमादार (पत्रकार) आता मुरगूड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी या प्रकरणात लक्ष देऊन नागरिकांना या ‘कचराकोंडी’ तून मुक्त करणार की ‘आम्हाला माहिती नाही’ म्हणत जबाबदारी टाळणार ? याकडे संपूर्ण मुरगूडकरांचे लक्ष लागले आहे.




