कोल्हापूर हादरले! नामांकित KIT कॉलेजच्या विभागप्रमुखाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; गुन्हा दाखल

कोल्हापूर (इरफान मुल्ला ): विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहरात एका संतापजनक घटनेने खळबळ उडाली आहे. गोकुळ शिरगाव येथील नामांकित ‘के.आय.टी.’ (KIT) कॉलेजमधील एका २० वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी संबंधित विभागाच्या विभागप्रमुखावर (HOD) गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी ही मूळची सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील असून ती सध्या कोल्हापुरात शिक्षण घेत आहे. संशयित आरोपी सौरभ संजय जोशी (रा. स्मृती अपार्टमेंट, बाबूजमाल दर्ग्याजवळ, कोल्हापूर) हा कॉलेजमध्ये विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहे. नोव्हेंबर २०२५ ते ४ मार्च २०२६ या कालावधीत ही घटना घडली. आरोपी सौरभ जोशी याने आपल्या पदाचा गैरवापर करत पीडित विद्यार्थिनीला अभ्यासाच्या बहाण्याने किंवा इतर कारणांनी वारंवार फोन आणि मेसेज करण्यास भाग पाडले. तसेच तिला वारंवार आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तिला केबिनमध्ये बोलावून तिच्याशी अश्लील वर्तन केले. इतकेच नव्हे तर तिला मिठी मारून तिचा विनयभंग केला. या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे विद्यार्थिनी प्रचंड तणावाखाली होती. अखेर धैर्याने तिने या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे ठरवले आणि पोलीस ठाणे गाठले.
पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून गोकुळ शिरगाव पोलिसांनी ७ मार्च २०२६ रोजी आरोपी सौरभ जोशी याच्याविरुद्ध अधिकृतपणे गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) मगदूम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. विनयभंगाच्या विविध कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका नामांकित शैक्षणिक संस्थेत अशा प्रकारे ‘गुरु-शिष्य’ नात्याला काळिमा फासणारी घटना घडल्याने पालक आणि विद्यार्थी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. “ज्यांच्यावर विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी आहे, तेच जर असे कृत्य करणार असतील तर सुरक्षितता कुठे शोधायची?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या प्रकरणातील आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई करून त्याला कठोर शासन करावे, अशी मागणी जोर धरत आहे.




