“रक्षकच जर भक्षक बनले, तर जनतेने न्याय मागायचा कोणाकडे?” – प्रियाताई शिरगावकर यांची संतप्त प्रतिक्रिया!

गोकुळ शिरगाव (इरफान मुल्ला ): गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी ७ लाखांच्या लाचेची मागणी केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या आणि महिला सन्मान परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई शिरगावकर यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
प्रियाताई शिरगावकर म्हणाल्या की, “पोलीस प्रशासन हे सामान्य जनतेसाठी न्यायाचे शेवटचे ठिकाण असते. मात्र, जर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, तेच राखणदार जर कायदा पायदळी तुडवून लाचेची मागणी करत असतील, तर सर्वसामान्यांनी विश्वास कोणावर ठेवायचा? ७ लाखांसारखी मोठी रक्कम मागण्याचे धाडस होतेच कसे? ही घटना पोलीस दलाच्या प्रतिमेला काळीमा फासणारी आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “सामान्य माणूस आधीच अनेक संकटांनी खचलेला असतो. न्यायाच्या आशेने तो पोलीस ठाण्याची पायरी चढतो, पण तिथे जर त्याच्याकडूनच अशा प्रकारे लुबाडणूक होणार असेल, तर त्याने न्याय मागायचा कोणाकडे? भ्रष्टाचाराची ही वाळवी प्रशासनाला पोखरत आहे. या प्रकरणात केवळ गुन्हा दाखल करून चालणार नाही, तर अशा प्रवृत्तींना प्रशासनातून कायमचे हद्दपार केले पाहिजे, जेणेकरून पुन्हा कोणा सामान्य माणसाची अडवणूक होणार नाही.”




