Uncategorizedमहाराष्ट्र ग्रामीण

के.आय.टी. विनयभंग प्रकरण: ‘महिला सन्मान परिषदे’चा कॉलेज प्रशासनावर धडक मोर्चा; आरोपी प्राध्यापकाच्या सेवा पुस्तिकेत ‘लाल शेरा’ मारण्याची मागणी

गोकुळ शिरगाव (इरफान मुल्ला) : के.आय.टी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील विद्यार्थिनीसोबत झालेल्या विनयभंगाच्या संतापजनक घटनेचे पडसाद आता तीव्र उमटू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ ‘महिला सन्मान परिषदे’च्या वतीने आज कॉलेज प्रशासनावर धडक देऊन प्राचार्यांना खडेबोल सुनावण्यात आले. “भविष्यात अशा घटना पुन्हा घडल्या, तर कायद्याची वाट न पाहता आरोपीला अगोदर जागीच ठोकून काढू आणि मगच पोलिसांच्या हवाली करू,” असा आक्रमक पवित्रा परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई शिरगावकर यांनी घेतला.

कायमस्वरूपी निलंबन आणि ‘लाल शेरा’ मारण्याची मागणी महिला सन्मान परिषदेच्या शिष्टमंडळाने आज के.आय.टी. कॉलेजचे प्राचार्य आणि गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनला निवेदन दिले. संबंधित नराधम प्राध्यापकाला केवळ निलंबित करून भागणार नाही, तर त्याला सेवेतून कायमचे बडतर्फ करावे. तसेच, त्याच्या सेवा पुस्तिकेत (Service Record) कायमस्वरूपी ‘लाल शेरा’ मारण्यात यावा, जेणेकरून त्याला उभ्या आयुष्यात पुन्हा कोठेही नोकरी मिळता कामा नये, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आक्रमक इशारा यावेळी बोलताना प्रियाताई शिरगावकर म्हणाल्या की, “शिक्षण क्षेत्रात अशा विकृत मानसिकतेच्या लोकांमुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. कॉलेज प्रशासनाने सुरक्षेच्या बाबतीत कोणती पावले उचलली आहेत, याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज आलो आहोत. जर या प्रकरणाचा तपास संथ गतीने झाला किंवा पीडितेला न्याय मिळण्यास उशीर झाला, तर ‘महिला सन्मान परिषद’ रस्त्यावर उतरून तीव्र उग्र आंदोलन छेडेल.”

यांची होती उपस्थिती या आंदोलनावेळी महिला सन्मान परिषदेच्या पदाधिकारी सीमा कांबळे, प्राजक्ता कांबळे, वैशाली माळवी, आक्काताई फाळके, दीपाली कांबळे, वंदना कांबळे, दिव्या कांबळे मनीषा कुरणे, पूजा मस्के,राणी कांबळे यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कायद्याचे रक्षण व्हावे आणि शांतता भंग होऊ नये, यासाठी या निवेदनाची एक प्रत गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनलाही देण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाने जर कठोर कारवाई केली नाही, तर महिलांचा हा संताप रोखणे कठीण जाईल, असा इशारा यावेळी उपस्थित महिलांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button