बोगस जातीच्या दाखल्यांच्या आधारे निवडणुका लढवणाऱ्यांवर कडक कारवाई करा; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन

कोल्हापूर (प्रतिनिधी): अनुसूचित जातीच्या (SC) आरक्षणाचा गैरवापर करून बोगस दाखल्यांच्या आधारे निवडणुका लढवणाऱ्या व्यक्ती आणि त्यांना साथ देणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात ‘अनुसूचित जाती (SC) आरक्षण बचाव जनआंदोलन समिती’ आक्रमक झाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शनिवारी, १४ मार्च २०२६ रोजी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री. प्रकाश आबिटकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
समितीने दिलेल्या निवेदनानुसार, हातकणंगले तालुक्यातील चांदूर येथील एका व्यक्तीने (महेष पाटील) मूळ लिंगायत समाजाचे असतानाही, राजकीय दबाव आणि आर्थिक व्यवहाराचा वापर करून प्रशासनाकडून २०१२ मध्ये अनुसूचित जातीचा (लिंगडेर) दाखला मिळवला. धक्कादायक बाब म्हणजे, याच व्यक्तीने पुन्हा २०२२ मध्ये ओबीसी (तेली) जातीचा दाखलाही मिळवला आहे. एकाच व्यक्तीने दोन वेगवेगळ्या प्रवर्गांचे दाखले मिळवून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप समितीने केला आहे. याच बोगस अनुसूचित जातीच्या दाखल्याचा वापर करून संबंधित व्यक्तीने २०२६ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत पट्टणकोडोली (SC राखीव) मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले आहेत.
अधिकाराचा गैरवापर करून बोगस दाखले देणाऱ्या इचलकरंजी प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना तत्काळ निलंबित करावे. बोगस दाखल्याच्या आधारे निवडणूक लढवून लोकशाहीची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द करावे. संबंधित व्यक्ती आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करावी.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी निवेदनाचा स्वीकार करून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. मूळ अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या अशा प्रवृत्तींची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले. यावेळी समितीच्या वतीने उत्तम कांबळे, मा आम डॉ सुजित मिणचेकर, मा आम राजीव आवळे, सुभाष देसाई, प्रिया शिरगावकर, बाळासाहेब भोसले, दुर्वस कदम, शिवाजीराव कवाळे, सोमनाथ घोडेराव, लालासाहेब नाईक, रघुनाथ मांडरे, सुभाष रामुगडे, पांडुरंग कांबळे, तानाजी गोंधळी, प्रदीप मस्के, देवानंद कांबळे, जयसिंग पाडळीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



