महाराष्ट्र ग्रामीण

परंपरेच्या बेड्या तोडून मुलीनेच दिला वडिलांना अग्नि; गोकुळ शिरगाव येथील हृदयद्रावक घटना!

गोकुळ शिरगाव (इरफान मुल्ला): ‘मुलगाच वंशाचा दिवा’ आणि ‘मुलानेच अंत्यविधी करावा’ या पुरातन सामाजिक समजुतींना फाटा देत, एका मुलीने पितृकर्तव्य पार पाडून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी सोलापूरहून गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत आलेल्या पूजा मस्के यांनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देत स्मशानभूमीत स्वतःच मुखाग्नी दिला.

पूजा मस्के यांचे वडील गेल्या काही दिवसांपासून अल्पशा आजाराने त्रस्त होते, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. मात्र, नियतीने एकाच वेळी दोन घाव घातले होते. सोलापूर येथील त्यांच्या मूळ गावी असलेल्या जवळच्या नातेवाईकाचेही त्याच दिवशी निधन झाल्याने, तिथून कोणीही गोकुळ शिरगावला येऊ शकले नाही.

परक्या मुलखात अंत्यविधीसाठी मदतीला कोणीही पुरुष नातेवाईक नसल्याने पूजा यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा होता. अशा कठीण प्रसंगी खचून न जाता, पूजा यांनी स्वतःच पुढाकार घेण्याचा धाडसी निर्णय घेतला. “मुलगीही मुलापेक्षा कमी नसते” हा संदेश देत त्यांनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला आणि साश्रू नयनांनी अंत्यसंस्काराचे सर्व विधी पार पाडले.

या अत्यंत बिकट आणि भावनिक प्रसंगाची माहिती मिळताच महिला सन्मान परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. केवळ सांत्वन न थांबता, या रणरागिणी स्वतः अंत्यविधीत सहभागी झाल्या आणि पूजा मस्के यांना धीर दिला. सामाजिक बांधीलकी जपत त्यांनी केलेल्या या मदतीमुळे एका निराधार मुलीला मोठे मानसिक बळ मिळाले.

गोकुळ शिरगाव परिसरात या घटनेची मोठी चर्चा आहे. रक्ताचे नातेवाईक लांब असूनही आणि समाजाच्या जुन्या परंपरा आडव्या येत असूनही, पूजा यांनी जे धैर्य दाखवले ते कौतुकास्पद आहे. संकटाच्या वेळी स्वतःला सावरून वडिलांना दिलेला हा अखेरचा निरोप उपस्थितांचे डोळे ओलावणारा ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button