मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाकडून लोकनेते स्व. सदाशिवराव मंडलिक यांना ११ व्या स्मृती दिनी विनम्र अभिवादन!

मुरगूड (बाळासो कांबळे): मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने लोकनेते स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा ११ वा स्मृती दिन मोठ्या आदराने साजरा करण्यात आला. यावेळी संघाच्या वतीने साहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. जयवंत हावळ यांनी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत केले. त्यानंतर माजी सैनिक श्री. पांडुरंग मेंडके यांच्या हस्ते सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘मंडलिक साहेब अमर रहे!’ आणि ‘मंडलिक साहेब जिंदाबाद!’ अशा घोषणा देऊन परिसर घोषणांनी दणाणून सोडला. या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी साहेबांसोबतच्या आपल्या आठवणींना भावनिक साद घातली:
श्री. सदाशिव एकल: त्यांनी आपल्या बदलीच्या संदर्भातील एक प्रसंग सांगितला आणि साहेबांनी कशा प्रकारे त्यांना मदत केली होती, याची कृतज्ञतापूर्वक आठवण काढली. श्री. सावर्डेकर बापू: “साहेबांमुळे आमच्या माळरानाचे रूपांतर बागायत जमिनीत झाले. यामुळे आमच्या जीवनात सुख आणि शांती लाभली. हे उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही,” असे भावूक उद्गार त्यांनी काढले. श्री. गजानन गंगापूरे (अध्यक्ष): आपल्या नोकरीच्या काळात साहेबांनी मुंबईतील आमदार निवासात आपली सहा महिने राहण्याची सोय कशी केली होती, याचा उल्लेख त्यांनी केला. “साहेबांनी नेहमीच दीन-दलित, कष्टकरी आणि सामान्य कार्यकर्त्यांना आधार देऊन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला,” असे ते म्हणाले. कार्यक्रमाचा समारोप श्री. सामंत सर यांनी आभार मानून केला. या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाला मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




