महाराष्ट्र ग्रामीण

मुरगूड-चिमगांव मार्गावरील ‘बागेचा ओढा’ मृत्यूचा सापळा; PWD प्रशासनाच्या नाकाखाली पुलाचे बांधकाम कोसळले!

मुरगूड (बाळासो कांबळे): मुरगूड-चिमगांव मार्गावरील ‘बागेचा ओढा’ येथील पुलाची अवस्था अत्यंत भयावह झाली असून, पुलाचे दगडी संरक्षण कठडे खालून पूर्णपणे कोसळले आहेत. विशेष म्हणजे, या गंभीर समस्येबाबत पत्रकार सिकंदर जमादार आणि पत्रकार बाळासो कांबळे यांनी ३ सप्टेंबर २०२५ रोजीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून वारंवार सूचना दिल्या होत्या. मात्र, या घटनेला आता सहा महिने उलटून गेले तरीही प्रशासनाने साधी दखलही घेतलेली नाही. PWD च्या या ढिम्म कारभारामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला असून, “प्रशासनाला एखाद्या मोठ्या बलिदानाची प्रतीक्षा आहे का?” असा संतापजनक सवाल नागरिक विचारत आहेत.

​बागेच्या ओढ्यावरील या पुलाचे खालून झालेले दगडी बांधकाम निखळल्यामुळे पुलाचा पाया कमकुवत झाला आहे. हा मार्ग मुरगूड आणि चिमगांवला जोडणारा मुख्य दुवा असल्याने येथे वाहनांची मोठी वर्दळ असते. पुलाचे दगडी संरक्षण कठडे ढासळल्याने रात्रीच्या वेळी तर येथे प्रवास करणे म्हणजे मृत्यूला साद घालण्यासारखेच आहे. पुलाची दुरावस्था इतकी भीषण आहे की, दोन अवजड वाहन एकाच वेळी पुलावर आल्यास एखादे वाहन थोडे जरी बाजूला गेले, तर थेट ओढ्यात कोसळून मोठा अनर्थ घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
​लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांनी समाजाप्रती असलेल्या बांधिलकीतून ३ सप्टेंबर २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंता सी.ए. पाटील, सागर कुंभार, अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. पत्रकार सिकंदर जमादार आणि बाळासो कांबळे यांनी वारंवार पाठपुरावा करूनही PWD चे अधिकारी केवळ आश्वासन देण्यातच धन्यता मानत आहेत. सहा महिने उलटूनही कामाला सुरुवात न होणे, हा प्रकार म्हणजे जनतेच्या जिवाशी चाललेला खेळच आहे.
​”पावसाळ्यापूर्वी जर हे काम झाले नाही, तर हा पूल पूर्णपणे वाहून जाण्याची भीती आहे. आम्ही वारंवार सांगूनही अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत आहेत,” अशा भावना स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. PWD कडे रस्ते दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी येतो, मग बागेच्या ओढ्यावरील पूल या किरकोळ वाटणाऱ्या पण अतिशय जीवघेण्या दुरुस्तीसाठी निधी कुठे जातो? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

प्रमुख मुद्दे:

बागेचा ओढा (पूल), मुरगूड-चिमगांव मार्ग येथील संरक्षण कठड्यांचे दगडी बांधकाम खालून कोसळले आहे. तक्रार करून ६ महिने उलटले तरी प्रशासन सुस्त त्यामुळे तात्काळ दुरुस्ती न झाल्यास जनतेचा उद्रेक अटळ. ​सहा महिने उलटूनही जर अधिकारी हलत नसतील, तर हा थेट कर्तव्यात कसूर करण्याचा प्रकार आहे. जर या पुलावर कोणताही छोटा-मोठा अपघात झाला, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी PWD च्या संबंधित इंजिनिअर्स आणि अधिकाऱ्यांवर राहील, असा इशारा देण्यात आला आहे. आता या बातमीने तरी कुंभकर्णी झोपेत असलेले अधिकारी जागे होतात की पुन्हा नवीन ‘तारीख’ देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button