महाराष्ट्र ग्रामीण

​शिंदेवाडीत दूषित पाण्याचा प्रश्न पेटला; शिवसेना (उबाठा) आक्रमक, प्रशासनाला ८ दिवसांचा अल्टिमेटम!

शिदेवाडी (बाळासो कांबळे): कागल तालुक्यातील शिंदेवाडी येथे गेल्या महिनाभरापासून नळाला अत्यंत दूषित, शेवाळयुक्त आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांचे आरोग्य पूर्णपणे धोक्यात आले असून, प्रशासनाच्या या हलगर्जीपणाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. सोमवारी विधानसभा संघटक मारुती पुरीबुवा यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीला धारेवर धरत ८ दिवसांत पाणी प्रश्न न सुटल्यास तीव्र ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
शिंदेवाडी गावात गेल्या ३० दिवसांपासून नळावाटे शेवाळमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने गावात साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. तसेच गावात ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत योजना मंजूर होऊनही ती अद्याप कार्यान्वित का झाली नाही? ती कधी पूर्ण होणार? याची लेखी मुदत प्रशासनाने द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व विधानसभा संघटक मारुती पुरीबुवा यांनी केले. यावेळी तालुकाप्रमुख जयसिंग टिकले, उपतालुकाप्रमुख समीर देसाई, विभागप्रमुख अमृत पाटणकर, शाखाप्रमुख श्रावण चिंतामणी ढेरे, उपशाखाप्रमुख शिवाजी जाधव आणि शिवसैनिक युवराज खराडे यांच्यासह अनेक आक्रमक शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सरपंच आणि ग्रामसेवकांना जाब विचारत स्पष्ट केले की, जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनाचा निषेध केला जात आहे. ग्रामपंचायतीने या दूषित पाण्यावर नेमकी काय तातडीची उपाययोजना केली आहे, याचे लेखी उत्तर आम्हाला हवे आहे.

​”गावातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी आम्ही प्रशासनाला ८ दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. जर या काळात स्वच्छ पाणी मिळाले नाही, तर शिवसेना आपल्या स्टाईलने प्रशासनाला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही.” — मारुती पुरीबुवा (विधानसभा संघटक, शिवसेना-उबाठा). या निवेदनावर मारुती पुरीबुवा, जयसिंग टिकले, समीर देसाई, अमृत पाटणकर, श्रावण ढेरे, शिवाजी जाधव, युवराज खराडे, नवनाथ पाटील, राजू दरेकर, या शिवसैनिकांच्या सह्या आहेत. ​या इशाऱ्यानंतर शिंदेवाडी ग्रामपंचायत प्रशासन नेमकी काय पावले उचलणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button