महाराष्ट्र ग्रामीण

मुरगूडमधील नेत्यांचे शब्द ठरले ‘पोकळ’; ३५ वर्षांची प्रतीक्षा आणि सूर्यवंशी-मांगोरे कॉलनीतील रहिवाशांचा वनवास!

​१५ मीटरच्या डी.पी. रस्त्यासाठी आता कोणाकडे हात पसरायचे? दिग्गज नेत्यांच्या दिलेल्या वचनांमुळे मुरगूडमधील नागरिकांचा संताप!

​मुरगूड (​प्रतिनिधी : बाळासो कांबळे): निवडणूका येतात, आश्वासनांची खैरात होते, दिग्गज नेते येतात, हात जोडून मते मागतात आणि ‘तुमचा रस्ता मी करून देतो’ असे शब्द देऊन जातात. पण मुरगूड शहरातील सूर्यवंशी-मांगोरे कॉलनीची व्यथा ही आहे की, येथे ३५ वर्षे उलटली तरी नेत्यांचे ते शब्द वाऱ्यावरच विरले आहेत. आज मुरगूडचे हे नागरिक विचारत आहेत की, दिलेली वचने पूर्ण होणार तरी कधी?
​या कॉलनीतून मुरगूड विकास आराखड्यातील १५ मीटरचा डी.पी. रस्ता मंजूर आहे. ही केवळ एक तांत्रिक बाब नाही, तर या भागातील शेकडो कुटुंबांच्या प्रगतीचा मार्ग आहे. आजवर अनेक दिग्गज नेत्यांनी या रस्त्याची पाहणी केली आणि “हा रस्ता मीच मार्गी लावणार” असे शब्द येथील नागरिकांना दिले. पण आजतागायत या रस्त्याला साधे मुरुमही मिळालेले नाही.

​जेव्हा पावसाळ्यात येथील नागरीक चिखलातून व लहान शाळकरी मुलांना खांद्यावरून किंवा आजारी वृद्ध व्यक्तीला हाताला धरून घेऊन जावे लागते, तेव्हा नेत्यांच्या त्या “शब्दांची” किंमत काय? असा संतप्त सवाल मुरगूडचे रहिवासी करत आहेत. गट क्रमांक २/१/६, २/१/१५, २/१/१६ आणि २/२/७ मधून जाणाऱ्या रस्त्याचे भूसंपादन गेल्या साडेतीन दशकांपासून का रखडले आहे? याचे उत्तर देण्यास ना नगर परिषद तयार आहे, ना ते दिग्गज नेते!

​या अन्यायाविरुद्ध पत्रकार सिकंदर जमादार यांनी प्रशासनासह नेत्यांचेही डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे. “नेते येतात आणि आश्वासन देऊन निघून जातात, पण मुरगूडमधील या कॉलनीतील रहिवाशांच्या पिढ्या चिखलात आणि रस्त्याअभावी अंधारात गेल्या आहेत. दिग्गज नेत्यांनी दिलेले वचन न पाळणे, हा येथील मतदारांशी केलेला विश्वासघात आहे. आता आश्वासने नकोत, प्रत्यक्ष काम हवे, अन्यथा आम्हाला न्यायालयाची पायरी चढावी लागेल.” — सिकंदर जमादार (पत्रकार).

​दिग्गज नेते जेव्हा मोठमोठ्या व्यासपीठावरून विकासाच्या गप्पा मारतात, तेव्हा त्यांना स्वतःच्या या जुन्या शब्दांची आठवण होत नसेल का? ३५ वर्षांच्या या वनवासानंतर आता तरी ते नेते आपल्या वचनाला जागणार की रहिवाशांच्या नशिबी पुन्हा पोकळ आश्वासनच येणार? असा सवाल आता संपूर्ण मुरगूड शहरासह सूर्यवंशी-मांगोरे कॉलनीतील नागरिक विचारत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button