खराब मशिन देऊन शेतकऱ्याची फसवणूक; ‘हावळ ऍग्रो’ विरोधात मुरगूड पोलिसांत तक्रार
अवचितवाडीतील शेतकऱ्याचा धाडस; न्यायालयीन लढाईचाही इशारा

अवचितवाडी (प्रतिनिधी : बाळासो कांबळे): कागल तालुक्यातील अवचितवाडी येथील एका शेतकऱ्याला खराब पावर विडर (मशिन) देऊन त्याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ‘हावळ ऍग्रो सर्विसेस’ विरोधात मुरगूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सिताराम पांडुरंग गायकवाड असे या फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी न्याय मिळवण्यासाठी आता कायद्याचा दरवाजा ठोठावला आहे. सिताराम गायकवाड यांनी एक ते दीड वर्षापूर्वी कागल पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे पावर विडर मिळावा म्हणून ऑनलाईन अर्ज केला होता. डिसेंबर २०२५ मध्ये त्यांना हे मशिन मंजूर झाले. मात्र, मशिन मिळाल्यानंतर पुढील दोन महिने केवळ ‘कोड नंबर’ मिळवण्यात गेले. कृषी विभागाच्या नियमानुसार, जोपर्यंत अधिकारी प्रत्यक्ष येऊन सर्व्हे करत नाहीत, तोपर्यंत संबंधित व्यक्ती अधिकृत लाभार्थी ठरत नाही. ही प्रक्रिया पूर्ण होऊन गायकवाड जेव्हा मशिन घेऊन शेताकडे निघाले, तेव्हा वाटेतच मशिन अचानक बंद पडले.

नवीन मशिन पहिल्याच दिवशी बंद पडल्याने गायकवाड यांनी तातडीने हावळ ऍग्रोच्या मालकांशी संपर्क साधला. मात्र, “मी गाडी चालवत आहे, संध्याकाळी फोन करतो,” असे सांगून त्यांनी टाळाटाळ केली. गायकवाड यांनी पतसंस्थेकडून एक लाख रुपयांचे कर्ज काढून हे मशिन खरेदी केले होते. मशिन वॉरंटीमध्ये असतानाही “आता वेळ नाही, नंतर बघू” अशी उत्तरे हावळ यांच्याकडून देण्यात आली.
हताश होऊन गायकवाड यांनी जेव्हा मशिनची तपासणी केली, तेव्हा धक्कादायक बाबी समोर आल्या: (१) मशिनमधील क्लच प्लेट्स पूर्णपणे खराब झाल्या होत्या (२) इंजिन ऑईलची पातळी अत्यंत कमी होती. (३) नियमानुसार २.५ लिटर ऑईल असणे आवश्यक असताना केवळ १.५ लिटर ऑईल मशिनमध्ये होते.
”मी कर्ज काढून हे मशिन घेतले होते, पण हावळ ऍग्रोनी माझी फसवणूक केली आहे. माझ्यासारख्या इतरही अनेक शेतकऱ्यांची अशीच फसवणूक होऊ शकते. मला न्याय मिळावा आणि भविष्यात कोणाचीही अशी दिशाभूल होऊ नये, म्हणून मी पोलिसांत तक्रार केली आहे. लवकरच मी याप्रकरणी न्यायालयातही दाद मागणार आहे.” — सिताराम गायकवाड (बाधित शेतकरी)
या प्रकरणी मुरगूड पोलीस अधिक तपास करत असून, कृषी विभागाच्या योजनांतर्गत पुरवल्या जाणाऱ्या साहित्याच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.



