महाराष्ट्र ग्रामीण
विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; KDRF पथकाची तातडीची मदत!

कोडोली, ता. पन्हाळा (सलीम शेख) : शेतात काम करत असताना विहिरीत पडून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोपट ज्ञानू यादव (वय ४८) हे १० ऑगस्ट रोजी सकाळी शेतातील विहिरीजवळ हातपाय धुण्यास गेले असता अचानक तोल जाऊन पाण्यात पडले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या KDRF पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अत्याधुनिक गळा उपकरणाच्या सहाय्याने यादव यांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
या बचाव मोहिमेत कृष्णात सोरटे, शुभम काटकर, प्रीतम केसरकर, प्रथमेश येरुडकर, शैलेश हांडे, अजय विरकर आणि रवी देवकर यांनी अत्यंत धाडसी आणि समर्पित भूमिका बजावली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून स्थानिक प्रशासनाने नागरिकांना विहिरीजवळ सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.