भीमा कोरेगाव आंदोलनाचे गुन्हे मागे घेण्यासाठी पालकमंत्री आबिटकर यांचे आश्वासन; आंबेडकरी समाजातर्फे आभार!

कोल्हापूर (प्रतिनिधी): भीमा कोरेगाव येथील ३ जानेवारी २०१८ च्या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यात दाखल करण्यात आलेले सुमारे १८०० आंबेडकरी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री मा. प्रकाशराव आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि आंबेडकरी समाजातर्फे त्यांचे जाहीर आभार मानण्यात आले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे जिल्हाध्यक्ष मा. उत्तम कांबळे आणि ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. सुभाष देसाई यांनी पालकमंत्री मा. प्रकाशराव आबिटकर यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले. भीमा कोरेगाव आंदोलनामुळे कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. सध्या पोलिसांकडून कार्यकर्त्यांना धरपकड सुरू असून, त्यांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. या धरपकडीला तात्काळ थांबवण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.
शिष्टमंडळाने केलेल्या मागणीची दखल घेत पालकमंत्री आबिटकर यांनी तात्काळ जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांना योग्य त्या सूचना देण्याचे आश्वासन दिले. तसेच, या संदर्भातील गुन्हे शासन स्तरावर मागे घेण्याबाबत, त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीचा अहवाल तात्काळ देण्याचे देखील आश्वासन दिले.
यावेळी शिष्टमंडळाने पालकमंत्री आबिटकर यांचे आभार मानले. आबिटकर यांच्या साधी राहणी, उच्च विचार आणि सर्वांना न्याय देण्याचे सामाजिक भान यामुळे ते सर्वसामान्य जनतेला आपले वाटतात, असे शिष्टमंडळाने नमूद केले.
याचबरोबर, कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख मा. अमित कुमार साहेब यांना देखील या विषयावर निवेदन देण्यात आले. पोलीस प्रमुख साहेबांनीही या निवेदनाची नोंद घेऊन सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले. त्याबद्दल त्यांचेही आंबेडकरी समाजाकडून आभार व्यक्त करण्यात आले.
या शिष्टमंडळात जनशक्ती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा. डी. जी. भास्कर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बाळू वाशीकर, सुखदेव बुद्धिहाळकर, जयसिंग पाडळीकर, गुणवंत नागटिळे, प्रदीप मस्के आणि दत्ता मिसाळ आदी उपस्थित होते.