
(को.टा. न्यूज़ नेटवर्क): प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नुकताच जम्मूमध्ये एका ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटनासाठी आला होता. मात्र, त्यांचा हा दौरा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अक्षय कुमारला विमानतळावर सोडल्यानंतर परत येणाऱ्या रेंज रोव्हर कारवर जम्मू वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.
या कारवाईचं कारण म्हणजे, कारच्या काचांवर मोटार वाहन कायद्याच्या नियमांपेक्षा जास्त गडद ‘ब्लॅक फिल्म’ लावलेली होती. नियमांनुसार, गाडीच्या काचांना जास्त गडद फिल्म लावणे हा गुन्हा आहे. पोलिसांनी गाडी थांबवून चौकशी केली असता, नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. त्यानंतर तात्काळ ही गाडी जप्त करण्यात आली. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, कायदा सर्वांसाठी समान आहे आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणारच.
ही घटना घडली तेव्हा अक्षय कुमार गाडीत नव्हते. त्यांना विमानतळावर सोडल्यानंतर चालक गाडी घेऊन परत येत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी अक्षय कुमारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.