कागलमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट: मुस्लिम समाजाने पोलिसांत दिली तक्रार!

कागल (सलीम शेख): सोशल मीडियावर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारी आणि धार्मिक विटंबना करणारी एक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्याने कागलमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी समस्त मुस्लिम समाजाने कागल पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
कागल हे छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी असून, येथे आजपर्यंत हिंदू-मुस्लिम समाजात कधीही जातीय तेढ निर्माण झाली नाही, असा अभिमान मुस्लिम समाजाने व्यक्त केला आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून “सर्जेराव पाटील” नावाच्या फेसबुक अकाउंटवरून एक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडून जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.
तक्रारपत्रात म्हटले आहे की, ही पोस्ट काल दुपारपासून संपूर्ण जिल्ह्यात वेगाने पसरत आहे. यामुळे समाजात अस्वस्थता असून, शांतता भंग होण्याची शक्यता आहे. समस्त मुस्लिम समाजातर्फे समीर नायकवडी आणि जावेद मकानदार यांनी पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात, या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास करावा आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या घटनेमुळे कागलमधील शांतताप्रिय वातावरण राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून तातडीने पावले उचलली जाण्याची अपेक्षा आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, सोशल मीडियावरील पोस्टचा तपास केला जात आहे.यावेळी लियाकत मुल्लानी, रहमान सय्यद, निहाल तहसीलदार, तैजीब शेख, साजिद समाधान, असीम नायकवडी यांच्यासह मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजातील मान्यवर उपस्थित होते.