महाराष्ट्र ग्रामीण

कागलमध्ये ‘आम्ही भारतीय लोक’ यांच्या वतीने निषेध फेरी: निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

कागल (सलीम शेख): निवडणूक आयोग आणि सत्ताधारी यांच्या संगनमताने होणाऱ्या ‘मतचोरी’ विरोधात आज ‘आम्ही भारतीय लोक’ या संघटनेच्या वतीने कागल येथे मतदार जागृती रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित नेहरू, क्रांतिसिंह नाना पाटील, भगतसिंग, राजगुरू, आणि सुखदेव यांच्यासारख्या देशभक्तांचे फोटो हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.
निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था असूनही, निवडणुका खुल्या आणि निष्पक्ष वातावरणात घेण्यासाठी पुरेसे प्रयत्न करत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. केवळ ईव्हीएमच नाही, तर इतर अनेक मार्गांनीही मतांची चोरी होत असून, नागरिकांचा मताधिकार हिरावून घेणे म्हणजे लोकशाहीची हत्या आहे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. याच गंभीर परिस्थितीचा निषेध करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली.
ही निषेध फेरी कागलमधील शिवाजी महाराज पुतळा (एसटी स्टँड) येथून सुरू होऊन संभाजी महाराज पुतळा (निपाणी वेस) आणि परत गैबी चौक, कागल येथे पोहोचली. गैबी चौकात रॅलीचे रूपांतर सभेत झाले. सभेचे प्रास्ताविक इंद्रजीत घाटगे यांनी केले. त्यानंतर अशोक शिरोळे, ईगल प्रभाकर, कॉम्रेड शिवाजी मगदूम, ॲड. सूर्याजी पोटले, आणि राज कांबळे यांनी आपले विचार मांडले.
यावेळी सज्जन पवार, ॲड. रुपेश वाघमारे, सचिन घोरपडे, बाळासाहेब कागलकर, नितीन काळभोर, बाबू मेटकर, शकील जमादार, हिदायक नायकवडी, सुशांत कालेकर, नाना बरकाळे, फिरोज चाऊस, तसेच वाघमारे ताई, बने ताई, पाटील ताई, शिरोळे ताई यांच्यासह कागल आणि निपाणी परिसरातील अनेक परिवर्तनवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button