पेठ वडगाव पोलिसांची मोठी कारवाई: ६२ लाखांचा गुटखा जप्त!

पेठ वडगाव (सलीम शेख ) : पेठ वडगाव पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत तब्बल ६२ लाख रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. गेल्या दोन महिन्यांत पोलिसांची ही तिसरी मोठी कारवाई असून, यातून अवैध गुटखा व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे.
१९ ऑगस्ट, २०२५ रोजी दुपारी १:४१ वाजता पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी टोल नाका येथे पोलिसांनी सापळा रचला. बंगळूरहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एमएच ०३ सीव्ही ३०१७ या क्रमांकाच्या ट्रकला पोलिसांनी थांबवून तपासणी केली. या तपासणीत, ट्रकच्या आत मोठ्या प्रमाणात केसरयुक्त विमल पान मसाला आणि गुटखा आढळून आला. पोलिसांनी या गुन्ह्यातून ६२,४५,३६० रुपये किमतीचा गुटखा आणि १५,००,००० रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ७७,४५,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिसांनी तात्काळ ट्रक चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या एका साथीदाराला ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांच्याकडे अधिक चौकशी सुरू असून, गुटख्याची वाहतूक कोठून होत होती आणि तो कुठे पोहोचवला जाणार होता, याचा तपास पोलीस करत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोसई माधव डिगळे करत आहेत.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, जयसिंगपूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पेठ वडगाव पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. पेठ वडगाव पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.