गोकुळ शिरगावात महाराष्ट्रातील पहिले ऊर्जा व्यवस्थापन केंद्र सुरू!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख): गोकुळ शिरगाव येथील औद्योगिक वसाहतीमध्ये महाराष्ट्रातील पहिले ऊर्जा व्यवस्थापन केंद्र सुरू झाले आहे. ‘गोशिमा सब क्लस्टर’ अंतर्गत ‘कोल्हापूर फाउंड्री अँड इंजिनिअरिंग क्लस्टर’च्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये हे अत्याधुनिक केंद्र उभारण्यात आले आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या ‘ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएन्सी’चे सचिव मिलिंद देवरे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले.
या केंद्राच्या उभारणीसाठी ५० लाख रुपयांचे अनुदान मिळाले असून, ऊर्जा लेखापरीक्षणासाठी लागणारी प्रगत उपकरणे जर्मनी व फ्रान्समधून आयात करण्यात आली आहेत. हे केंद्र केवळ फाउंड्री उद्योगांसाठी मर्यादित नसून, साखर उद्योग, आरोग्यसेवा, हॉस्पिटॅलिटी अशा विविध क्षेत्रांना ऊर्जा लेखापरीक्षण सेवा देणार आहे. यामुळे उद्योगांना त्यांच्या वीज बिलात ५% ते १०% पर्यंत बचत करणे शक्य होणार आहे.
हे केंद्र जुन्या आणि कमी कार्यक्षम उपकरणांच्या जागी नवीन, अधिक कार्यक्षम यंत्रणा बसवण्यासाठी प्रोत्साहन देईल. ज्यामुळे महाराष्ट्राची ऊर्जा कार्यक्षमता वाढेल आणि डीकार्बोनायझेशन तसेच नेट-झिरो उद्दिष्टांकडे वाटचाल अधिक वेगाने होईल.
उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो आणि अनेक नामवंत उद्योजक उपस्थित होते. ‘कोल्हापूर फाउंड्री अँड इंजिनिअरिंग क्लस्टर’चे अध्यक्ष दीपक चोरगे यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली. उद्योजक प्रकाश मालाडकर यांनी आभार मानले. यावेळी गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम, संजय देंशिंगे, खजिनदार अमोल यादव यांच्यासह नितीनचंद्र दळवाई, सचिन शिरगावकर, मोहन पंडितराव, सारंग जाधव, विनायकुमार चौगुले, पद्मराज पाटील, विनय खोबरे, धनंजय दुग्गे, कमलकांत कुलकर्णी, राजू पाटील, भारत जाधव, मोहन कुशिरे, वीरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.