शहापुरात घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील सहा जण जखमी!

शहापूर,ता. हातकणंगले (सलीम शेख) : तोरणानगर सहारा निवारा कॉलनी येथे २३ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एका घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील सहा सदस्य जखमी झाले. या घटनेत घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, संबंधित बांधकाम करणाऱ्या व्यक्तीविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमीर शाहबुद्दीन गोलंदाज (रा. तोरणानगर, शहापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा शेजारी नानासो शिवाजी वायंदडे (रा. लालनगर, इचलकरंजी) यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. या आर.सी.सी. बांधकामामुळे गोलंदाज यांच्या घराची पश्चिमेकडील भिंत अचानक कोसळली. त्यावेळी घरात झोपलेले जमीर गोलंदाज, त्यांची पत्नी जबिन, मुलगा अमन, मुलगी आलिया, मुलगी आलिशा आणि वडील शाहबुद्दीन हे सर्वजण भिंतीखाली दबले जाऊन जखमी झाले.
या अपघातात घरातील फ्रीज, टीव्ही आणि लोखंडी कपाटासह सुमारे ५० हजार रुपयांचे साहित्य खराब झाले. जमीर गोलंदाज यांनी यापूर्वीही बांधकाम सुरू असताना धोकादायक झालेल्या भिंतीबद्दल वायंदडे यांना वारंवार सांगितले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
जखमींना तातडीने उपचारासाठी इचलकरंजी येथील आय.जी.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल अवघडे यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बांगर करत आहेत.