अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत द्या: कागलमध्ये शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोर्चा!

कागल (सलीम शेख ) : अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, या मागणीसाठी कागल तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तहसील कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला आणि निदर्शने केली. उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोयाबीन, भात, ऊस आणि भुईमूग यांसारखी पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांनी कर्ज काढून, खते आणि बियाणे वापरून शेतीत मोठी गुंतवणूक केली होती, परंतु आता पिके पूर्णपणे खराब झाल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत शेतकरी असल्याने, शासनाने त्वरित पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर संभाजीराव भोकरे यांनी तहसीलदार अमरदीप वाकडे यांना जाब विचारत “आतापर्यंत किती शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आणि कोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळाली याची यादी द्या,” अशी मागणी केली. शासनाने केवळ आश्वासने न देता, प्रत्यक्ष मदत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या मागण्यांचे निवेदन तहसीलदार वाकडे यांना देण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, कागल शहर प्रमुख अजित मोडेकर, उपजिल्हा संघटिका विद्याताई गिरी, वाहतूक सेनेचे म्हाळू करिकट्टे, उपशहर प्रमुख प्रभाकर थोरात, माजी तालुका प्रमुख अशोक पाटील, विभाग प्रमुख संदीप कांबळे, वैभव आडके, उपतालुका प्रमुख दिनकर लगारे, शाखाप्रमुख दादाराव मालवेकर, रामदास पाटील, किरण दळवी, अजित बोडके, युवा सेनेचे वैभव मोडेकर, रामचंद्र गिरी, चंद्रकांत सांगले यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.