गोकुळ शिरगाव ग्रामपंचायत कारभारात महिला सदस्यांचे पतींचा हस्तक्षेप: लोकशाहीचे वस्त्रहरण?

गोकुळ शिरगाव (प्रतिनिधी): गोकुळ शिरगाव येथील ग्रामपंचायत कारभारात महिला सदस्यांच्या पतींचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप करत, ‘महिला सन्मान परिषद’ या सामाजिक संघटनेने या गंभीर प्रकरणाची तक्रार गटविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारे यांच्याकडे केली आहे. महिला सन्मान परिषदेच्या वतीने डॉ. भंडारे यांना प्रत्यक्ष भेटून या संदर्भात निवेदन देण्यात आले असून, यात महिलांच्या नावावर त्यांचे पतीच कारभार करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५०% आरक्षण दिले जाते, जेणेकरून त्यांना निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेता येईल. परंतु गोकुळ शिरगावमध्ये या आरक्षणाचा गैरवापर होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. महिला सदस्य केवळ नावालाच असून, त्यांच्या अधिकारांचा वापर त्यांचे पती करत आहेत. पतीच ग्रामपंचायतीच्या बैठकांमध्ये सहभागी होतात, विकासकामांचे निर्णय घेतात आणि सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधतात. यामुळे लोकशाही मूल्यांचे आणि महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाचे ‘वस्त्रहरण’ होत असल्याचा दावा ‘महिला सन्मान परिषदे’ने केला आहे. महिला सदस्यांना त्यांच्या अधिकारांबद्दल पुरेसे ज्ञान नसल्यामुळे किंवा सामाजिक दबावामुळे पतींचा हस्तक्षेप वाढल्याचे दिसून येते. यामुळे गावाच्या विकासाचे निर्णय घेण्यात महिलांचा सहभाग कमी होतो.
या गंभीर गैरव्यवहाराकडे लक्ष वेधून, ‘महिला सन्मान परिषदे’ने गटविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारे यांच्याकडे यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्वरित लक्ष घालून, या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने अशा महिला सदस्यांचे पद रिक्त करावे व त्यांना पदावरून काढून टाकण्यात यावे महिला सदस्यांना त्यांचे अधिकार बजावण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. या गंभीर समस्येकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही होत आहे. महिला सदस्यांना त्यांच्या पतींचा हस्तक्षेप टाळण्यासाठी मार्गदर्शन करण्याची किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र, अनेक ठिकाणी याकडे दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे ही समस्या अधिक वाढत आहे.
जर या प्रकरणावर तातडीने कारवाई झाली नाही, तर ‘महिला सन्मान परिषद’ आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. या तक्रारीमुळे आता स्थानिक प्रशासकीय पातळीवर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता आहे, आणि भविष्यात ग्रामपंचायतीच्या कारभारात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी महिला सन्मान परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई शिरगावकर, सीमा कांबळे, प्राजक्ता कांबळे, दीपाली बेलेकर, पाकिजा तहसीलदार, राणी कांबळे, दीपाली कांबळे, पूजा मस्के, मनीषा कुरणे आदी महिला उपस्थित होत्या