महाराष्ट्र ग्रामीण

पाचगावमध्ये बंदुकीचा धाक दाखवून धमकावणारे तिघे जेरबंद; ६ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त!

कोल्हापूर (सलीम शेख ) : आगामी गणेशोत्सव आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार पोलिसांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. याच मोहिमेअंतर्गत पाचगावात एका तरुणाला बंदुकीचा धाक दाखवून धमकावणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून बंदुकीसह ६ लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही घटना २५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री घडली. पाचगावातील बळवंतनगर मित्र मंडळाची गणपती आगमन मिरवणूक आर. के. नगरहून पाचगावकडे जात असताना सहजीवन सोसायटी परिसरात ऋषिकेश भोसले (रा. पाचगाव) आणि रणजित गवळी, चेतन गवळी व अरुण मोरे यांच्यात किरकोळ वाद झाला.
वाद मिटल्यानंतर मिरवणूक पुन्हा सुरू झाली. मात्र, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ऋषिकेश भोसले घरी परत जात असताना रणजित गवळी आणि अरुण मोरे यांनी त्यांच्या वॅगन आर कारमधून त्याला अडवले. यावेळी रणजित गवळीने आपल्याकडील बंदूक ऋषिकेशच्या डोक्याला लावून ‘तुला आता जिवंत सोडत नाही’ अशी धमकी दिली आणि तेथून पळून गेले. या प्रकारामुळे घाबरलेल्या ऋषिकेशने दुसऱ्या दिवशी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
या घटनेची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार सत्यजित तानुगडे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने पाण्याचा खजिना येथे सापळा रचून तिन्ही आरोपींना वॅगन आर गाडीसह ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रणजित राजाराम गवळी (वय ३९, रा. सहजीवन सोसायटी, पाचगाव), अरुण संभाजी मोरे (वय २९, रा. बापुरामनगर, कळंबा) आणि चेतन राजाराम गवळी (वय ३६, रा. सहजीवन सोसायटी, आर. के. नगर) अशी आहेत. चौकशीदरम्यान, त्यांनी जुन्या वादातून ऋषिकेश भोसले याला बंदुकीने धमकावल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्यांच्याकडून एक विनापरवाना सिंगल बोअर बंदूक, जिवंत काडतूस आणि गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी तसेच वॅगन आर कार असा एकूण ६ लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, सत्यजित तानुगडे, दीपक घोरपडे आणि अरविंद पाटील यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button