गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हुपरी पोलीस ठाणे हद्दीत रेकॉर्डवरील आरोपींना प्रवेशबंदी!

हुपरी (सलीम शेख ) : गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हुपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेकॉर्डवरील काही गुन्हेगारांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ नुसार अपर तहसीलदार, इचलकरंजी यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत.
गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण असून, या काळात सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये आणि कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांनी तयार केलेल्या यादीनुसार, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना या आदेशाद्वारे हुपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे उत्सवादरम्यान शांततापूर्ण वातावरण राखण्यास मदत होईल.
ज्या व्यक्तींना ही प्रवेशबंदी लागू आहे, त्यांनी या आदेशाचे पालन करावे, अन्यथा त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




